कुडणूरकर दक्ष! कोरोनाचे समुळ उच्चाटन हेच आमचे लक्ष्य !! : अमोल पांढरे,माजी सरपंच,ग्रा.पं.कुडणूर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कुडणूर:
प्रत्यक्ष, काळाच्या मुखात उडी घेवून साक्षात मृत्यूलाही जाब विचारणारे व मरणालाही दरडावणारे कुडणूर हे गाव आणि ग्रामस्थ गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ आहेत. देशाच्या शत्रुला रणांगणात लोळविणा-या बहाद्दर सैनिकांचे गाव म्हणून कुडणूरची ख्याती आहे. साधू-संतांच्या विचारांची प्रचिती गावात पहायला मिळते. शूरवीरांचा वारसा लाभलेल्या या हनुमंताच्या पंढरीत आजही वीर खेळविला जातो. संग्रामी, शौर्यशाली आणि शक्तीशाली बापजाद्यांचा फार मोठा इतिहास गावाला आहे. त्यामुळे अभिमानाच्या आणि इतिहासाच्या अनेक खाणा-खुणा हे गाव आपल्या अंगाखांद्यावर मिरवत आहे. मात्र अशा या अत्यंत महत्वाच्या गावाला, कोरोना नावाचा आजार आणि या आजारामुळे निर्माण झालेली नकारात्मक पार्श्वभूमी गेल्या कांही दिवसांपासून सतावत आहे. भिती दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कुडणूर हे माझे गावं… जे नेहमी आनंदाने आणि उत्साहाने ओसंडून वाहायचे, एकमेकांना मदत करण्यासाठी आघाडीवर असलेले ग्रामस्थ व मित्र – मंडळी गावात पहायला मिळायचे. त्या गावचे गावपणंच हरवून गेलं आहे. सार्वजनिक कार्यात सदैव सहभागी असणारे कार्यकर्ते हे गावचे प्रमुख वैशिष्ट्य! नेहमी हास्य-विनोदात रंगलेले, चेष्टा-मस्करी करणारे कुडणूरकर, गावचे ग्रामदैवत असलेल्या हनुमंताच्या नामस्मरणामध्ये रमलेले भक्त, धनगरी ओव्यांसाठी गळ्यात ढोल आणि हातामध्ये कैताळ घेवून घरगूती व सार्वजनिक कार्यक्रमांमधे ओव्या सादर करणारे शाहीर व त्यांचे ओविकार मंडळ, चिंचणी मायाक्काची यात्रा, हुलजंतीच्या म्हालिंगरायाची यात्रा, आरेवाडीच्या बिरुदेवाची यात्रा, मंगसोळीच्या खंडोबाची अमावस्या, संत बाळूमामांची मेंढर, गावातील गुढी पाडव्याची यात्रा, कर्नाटकी बेंदूर, सिद्देश्वराची यात्रा, मरीआईची जत्रा, सटुआईची यात्रा यासह विविध धार्मिक सण-समारंभात सर्व ग्रामस्थ हिरीरीने सहभागी व्हायचे. महापुरुषांचे विचार त्यांची जयंती राजकीय-सामाजिक घडामोडी या अनुषंगाने विविध विषयांवर सर्वत्र चर्चा ऐकायला मिळायची. पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त, त्यांची वारी,मंदीरातील पारायणं,पोथ्या वाचनं,वारक-यांचे भजन-किर्तन, परमेश्वराचे नामस्मरणं, पुजा-अर्चा, व्रत-वैकल्यं, कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे गावं नेहमी गजबजलेलं असायचं. धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गावकरी नेहमी दंग असायचे.आपल्या शक्ती आणि युक्तीचा वापर करुन जगभरात गावाचे नाव करण्यासाठी धडपडणारे धेय्यवेडे कार्यकर्ते गावात पहायला मिळायचे.त्यामुळे समाजकार्य असो की राजकारण त्यावरती आपला वेगळा ठसा उमटवणा-या राजकारणी व समाजकारण्यांचे हे गाव! मात्र ते आज संकटात सापडले आहे. ५ दिवसात ८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे वर्तमानपत्रात कुडणूरचे नाव कोरोनाच्या नकारात्मक पार्श्वभुमीवर गाजू लागले. परिणामी बघता-बघता कुडणूरचे पारंपारिक रुपडं बदलून गेलं. ज्या चेह-यांवरती नेहमी आनंद ओसांडून वाहयचा, ज्या अंगामध्ये हजारो हत्तींचं बळ संचारलेलं असायचं,अशी सतत दिर्घोद्योगी असलेली ही माणसं दबावाखाली आली आहेत. एकामामगून एक अनेक महत्वाची मोठी माणसं काळाच्या पडद्याआड गेली. कोणाचा मुलगा, कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाचा भाऊ त्याशिवाय मुलापाठोपाठ आईदेखिल काळाच्या पडद्याआड गेली. घरातील कर्ती माणसं सोडून गेल्यानं गावं चिंतेत आहे. माणसांच्या चेह-यावर भिती दिसू लागली आहे. त्यातच मृत्यूमुखी पडणा-यांचा आकडा वाढत गेला आहे. बघता – बघता तो २ अंकी झाला आहे.जे ग्रामस्थ एकमेकांना सोडून रहात नव्हते, त्यांना अंत्यसंस्कारालाही जाता येईना. काळ मोठा कठीणं आला आहे. तो सर्वांची परिक्षा घेत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे मनं सुन्न झाले आहे. गेलेली सर्वच माणसं माझ्याजवळची आहेत. त्यांच्या सहवासात मी लहानाचा मोठा झालो आहे. आम्ही एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो आहे. त्यामुळे या गावच्या मातीचे मातृऋण फेडण्यासाठी माझा जीवं नेहमीच जीव कासावीस झालेला असतो. तसा आजही कासावीस झाला आहे. त्यामुळे या अनुषंगानेच मला माझ्या माणसांशी संवाद साधायचा आहे. या काळात मी सर्वांना भेटू शकत नाही. परंतू महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून अनेकजण फोनवरुन चौकशी करत आहेत. मदतीसाठी विचारत आहेत. जे ग्रामस्थ कामाधंद्यानिमित्त मुंबई – पुण्यासारख्या शहरात राहत आहेत. ते माझ्याकडे विचारणा करत आहेत, सर्वांची ख्याली – खुशाली विचारत आहेत. कांही सुचना करत आहेत. मार्गदर्शनं करत आहेत. लाख मोलाचे सल्ले देत आहेत. त्यामुळे त्यांचा निरोप या माध्यमातून मला ग्रामस्थांना द्यायचा आहे. त्याशिवाय मलाही आपल्या सर्वांसोबत बोलायचं आहे. म्हणूनच हा लेखनप्रपंच करत आहे. बांधवांनो, ही वेळ चिंता करायची नाही. तर चिंतेवर चिंतन करण्याची आहे. असं म्हंटल जातं की, माणसाने कर्ज, शत्रू आणि रोग या तिघांची थोडीसुद्धा बाकी ठेवायची नसते. कारण, कर्ज वेळेवर फेडले नाही तर व्याजाचा बोजा वाढत जातो. हे कर्ज आणखी वाढले तर आहे ते घर आणि शेतीवाडीही विकण्याची दुर्देवी वेळ माणसावर येते. शत्रूला पूर्णतः नष्ट केले नाही. तर कालांतराने तो पुन्हा आक्रमण करण्याचा धोका अधिक असतो. हे आपण इतिहासाच्या पुस्तकात शिकलो आहे. आणि रोगाचा पुरता बिमोड केला नाही तर तो रोग पुन्हा – पुन्हा उद्भवतो. त्यामुळे यांची बाकी शिल्लक ठेवायची नसते. हे प्रश्नं कायमस्वरुपी मिटवावे लागतात. त्यांचा बीमोड करावा लागतो. तद्वतच कोरोना आणि इतर कोणतेही रोग पुन्हा जन्माला येणार नाहीत. याचा बंदोबस्त आपल्याला करावा लागणार आहे. त्यामुळे आता आपल्यालाही कोरोना नावाच्या शत्रुला भिडावे लागणार आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, संकटांना पाठ दाखविली की, संकटे पाठीशी लागतात. त्यामुळे जीवनात संकटे आली तर त्यांना खंबीरपणे सामोरं जावं लागेल. हे लक्षात राहू द्या. संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे. संकटाचा सामना केला की, मनं खंबीर बनते. मात्र त्याच्यापासून पळायला लागलो की, ते जास्तच पाठीशी लागते. म्हणून सत्य स्वीकारले पाहिजे संकटाचा मुकाबला केला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी शासन व प्रशासनाला सहकार्य करुन सर्व सराकारी सुचनांचे, आशा वर्कर्स, पोलीस पाटील, आरोग्य सेवक, डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पोलीस अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांनी केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालनं केले पाहिजे. त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. इथे सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजेच आपण, आपले कुटुबं आणि गावं सुरक्षीत करणे होय. चिंतेने मनुष्य निराश आणि हतबल होतो. चिंता ही बऱ्याच वेळा आकारण असते. मात्र चिता ही माणसाला मेल्यानंतर जाळते तर चिंता ही जिवंतपणीच जाळते. हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे चिंता जर त्रास द्यायला लागली, तर चिंतेवरतीच चिंतन करावे आणि आपल्यापुढे नेमकी कोणती समस्या आहे ? ती दूर करण्याचे कोणते मार्ग उपलब्ध आहेत ? व त्यातील सर्वोत्तम मार्ग कोणता आहे ? अशा प्रश्नांचे चिंतन केले पाहिजे. त्यातून योग्य तो उपाय, मार्ग शोधून काढला पाहिजे आणि तो उपाय अंमलात आणण्यासाठी सर्वांनी शंभर टक्के प्रयत्नं केले पाहिजेत. तरच चिंतेचा हा भला मोठा रोगदेखिल बघता – बघता नाहीसा होईल. भित्यापोटी ब्रम्हराक्षस असे म्हंटले जाते. त्यामुळे माणसाने आयुष्यात निर्भयतेने जगावे. भितीमुळे माणसाचे बुद्धी सामर्थ्यही नष्ट होते. तो हतबल होऊ लागतो. म्हणून निर्भय व्हा ! अकारण काळजी करणे म्हणजे न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखे आहे. काळजी केल्याने उद्याचे दुःख कमी होण्याऐवजी ते आणखी वाढते. आजची आहे ती ताकदही कमी होते. त्यामुळे काळजी करीत बसण्यापेक्षा काळजी घेणे हे अधिक फायदेशीर असते. काळजीमुक्त जीवन जगणे हे आज आपल्यासाठी फार महत्वाचे आहे. काळजी करणे म्हणजे नदी समोर नसतानाही ती पार कशी करू ? या विचाराने हैराण होण्यासारखे आहे. म्हणून अकारण काळजी करु नका. काळजीमुळे तुमचे माणसिक आणि शारिरीक स्वास्थ्य बिघडेल. आणि या काळात आपले स्वास्थ्य टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. परिणामी काळजी घ्या ! पण काळजी करु नका !! ही नम्र विनंती. तुमच्यासोबत आम्ही सदैव आहोत. ‘ठेच’ दोन कारणांनी लागते. एक म्हणजे मुळीच न पाहिल्यामुळे किंवा फार दूरवर पाहिल्यामुळे. त्यामुळे चालताना पायाखाली लक्ष न दिल्यास किंवा फार दूरवर पाहिल्यास ठेच लागते. म्हणून कोणतीही गोष्ट एकदम दुर्लक्षित करणे आपल्याला महाग पडते. तद्वतच कोरोनाकडे दुर्लक्ष करु नका. आपल्याला ठेच लागणार नाही. याची काळजी घ्या, सावध रहा…! वेळ फार कठीण आहे. तुम्ही दुर्लक्ष केले किंवा उशिरा जागे झाला म्हणून जग तुमच्यासाठी थांबणार नाही. जगातील सगळी चक्र अव्याहतपणे स्वतःच्या गतीप्रमाणे चालूच आहेत. त्यामुळे आपणास आता या गतीशी जुळवून घ्यायचे आहे. कारणं वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार व पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस काय कामाचा नसतो. पिके पाण्याअभावी जळाल्यावर उशिरा पाऊस पडला तर कांही फायदा होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष गरज असताना योग्य विचार सुचला नाही तर ती वेळही व्यर्थ ठरते. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाच्या या नकारात्मक पार्श्वभुमीवर आपल्याला आपल्या मनाचे आणि त्याचबरोबर गावाचे स्वास्थ्य सुधारायचे आहे. सामाजिक स्वास्थ्य सुधारायचे आहे व त्यासाठी आता सर्वांनी पुढे यायचे आहे. सहकार्याची भुमिका घ्यायची आहे. या लढाईत वेळ वाया घालवायचा नाही. कारण ज्याने वेळ वाया घालवला आहे. त्याच्याजवळ आयुष्यात गमवायला कांहीही शिल्लक रहात नाही. वेळ अत्यंत गतिमानं आहे. वेळेजवळ तुम्हाला घालविलेली वेळ पुन्हा देण्यासाठीही वेळ शिल्लक नाही. हे लक्षात घ्या. वेळ एक नाशवंत गोष्ट आहे पण ती तितकीच फलदायी आहे. हे पण लक्षात घ्या. वेळेचा सदुपयोग केल्यास आपण अशक्य ते शक्य करु शकतो. त्यामुळे संबंधितांना वेळीच औषधोपचार कसे मिळतील ? याकडे सर्वांनी लक्ष द्यायचे आहे. बांधवांनो, “भित्री” माणसं मरण येण्यापूर्वीच अनेकदा मरत असतात. मात्र शूरवीर एकदाच मरत असतो. कुडणूर ही शुरवीरांची भुमी आहे. हे आपण यापुर्वी अनेकदा आपल्या कृतीने सिद्द केले आहे. किंबहूना हा आपला इतिहास आहे. त्यामुळे आता आपल्या सर्वांनाच या इतिहासाची आणखी एकदा पुनरावृत्ती करायची आहे. जे लोक भित्रे असतात ते नेहमी घाबरून, दबून वावरत असतात, वागत असतात. त्यामुळे परिस्थिती त्याचा फायदा उठवते. परिणामी आपले आणि आपल्या लोकांने फार मोठे नुकसान होते. तेंव्हा हे नुकसान टाळण्यासाठी, गावावरील आलेले संकट दूर करण्यासाठी सर्वांनी पुढे यायचे आहे. त्यासाठी सरकारने देवू केलेली लस घ्यायची आहे. आणि मनामध्ये असलेली भिती काढून व गाडून टाकायची आहे. माणसाला आरोग्य हवे असते. पण त्यासाठी पहाटे उठून व्यायाम करणे, योग्य आहार घेणे नको असते. व्यसनाधीनता हवी असते पण आजार नको असतात. यश हवे असते पण त्यासाठी कष्ट नको असतात. वाचन नको असते मात्र ज्ञान हवे असते. फायदे हवे असतात पण जबाबदाऱ्या नको असतात. त्यामुळे असली घाणेरडी माणसिकता बदलावी लागेल आणि आपल्याला आपल्या स्वभावात अपेक्षीत बदल करावा लागेल. गावच्या हितासाठी, ग्रामस्थांच्या हितासाठी कांही राष्ट्रीय कर्तव्ये आणि जबाबदा-याही पार पाडाव्या लागतील. तर आणि तरच आपण या शत्रुचा पाडाव करु. त्यामुळे आपल्या जबाबदा-या आता प्रत्येकाने ओळखल्या पाहिजेत. आणि या जबाबदा-या व कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. आपले हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत. सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, मास्क लावला पाहिजे, आपली ऑक्सिजन लेव्हल, ब्लड प्रेशर, शरिराचे तापमानं, पल्स रेट, वेळोवेळी तपासून घेतले पाहिजे. त्याशिवाय माझ्या कुटुंबाचे आणि गावचे आरोग्य ही माझी जबाबदारी आहे. हे लक्षात घेवून, सरकार, शासन – प्रशासनानं, ग्रामपंयाचत, सामाजिक कार्यकर्ते, आशा वर्कर्स, आरोग्य सेवक, स्थानिक डॉक्टर यांना सहकार्य केले पाहिजे. त्यांना सत्य सांगितले पाहिजे. केवळ दुस-याकडे बोट करु नये. आपले घर, परिसर, गल्ली आणि गावं स्वच्छ व सुंदर ठेवले पाहिजे. जंतूनाशकाची फवारणी केली पाहिजे, त्यासाठी ग्रामपंचायतीकडे आग्रह धरला पाहिजे. या काळात, जे गावच्या हितासाठी कार्यरत आहेत. त्यांना इज्जत द्या, त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या…! कारण, आयुष्यात तिनं गोष्टी सतत देत राहा. त्या म्हणजे इतरांना मान, ज्ञान आणि दान. त्यामुळे या तिन्ही गोष्टींपैकी ज्यांना जे हवे आहे. त्यांना तुमच्याजवळ जे कांही आहे त्यातलं किमानं थोडफार तरी सतत देत रहा. मुळातच ज्ञानदान हे गुणकारी आहे. ते दिल्याने कमी न होता वाढत राहते. दुसऱ्याला मान देण्यात… नम्रता, सभ्यता आणि आदर दिसून येतो. त्यामुळे मानं आणि ज्ञान देणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. वाहते पाणी वाटेत आलेले खाचखळगेही भरल्याशिवाय पुढे जात नाही. ते म्हणत नाही की, हे खाचखळगे मी का भरु ? कारण दुस-याला भरभरुन देणे हाच त्या पाण्याचा स्वभावधर्म आहे. त्यामुळे आपण सर्वांनीदेखिल हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. आपल्या शेजापाजा-याच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढे या. त्यांना मदत करा. ग्रामस्थांच्या अडीअडीचणी सोडविण्यासाठी त्यांना मदत करा, पुढे या ! शारीरिक सुदृढता आणि मानसिक निर्भयता हा पुरुषार्थाचा गाभा आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना हा पुरुषार्थ आता गाजवावा लागणार आहे. इथे पुरुषार्थ गाजविणे म्हणजे एकत्रित येवून सामुदायिकरित्या गावावरती आलेले संकट दूर करणे होय. आपल्याला आपली माणसं वाचविण्याचा पुरुषार्थ गाजवावा लागणार आहे. बांधवांनो, गवताच्या काडीला कोणतीही किंमत नसते. कारण तिला काडीचंही महत्वं नसतं. मात्र अशा असंख्य काड्या एकत्रित केल्या आणि त्यांच्यामध्ये एकी झाली. तर या काड्यांचीही बघता – बघता एक पेंडी होवू शकते आणि या पेंडीने, आपण उधळलेल्या हात्तीलाही सहज बांधून ठेवू शकतो. एवढी ताकत त्या पेंडीमध्ये असते. म्हणजेच एकत्रित येण्यामध्येच अनेक फायदे आहेत. त्यामुळे एकीचे बळं आणि मिळते फळं अशी म्हणं तयार झाली आहे. कोरोनाविरुद्दच्या या लढाईत आपल्याला अशाच पद्दतीने एकीने लढायचे आहे. एकजीव होवून लढायचे आहे. परिणामी यश आपल्या पायाशी लोळणं घेईल. सहकार्याच्या आणि सुसंवादाच्या जोरावती कोरनाचे गाठोडे बांधून त्याला पुरुन उरायचे आहे. थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी सांगितले आहे की, हात उगारण्यासाठी नसतात तर ते उभारण्यासाठी असतात. माणसाची सर्जनशीलता ही माणूसपणाची खूण आहे. त्यामुळे माणसाने आपले सगळे सामर्थ्य कांहीतरी चांगले कार्य उभे करण्यासाठी वापरले पाहिजे. आपल्या सामर्थ्याचा उपयोग दुसऱ्यावर आक्रमण किंवा हल्ला करण्यासाठी करु नये. विध्वंस करण्यासाठी आपले जीवन नाही. हे माणसाने ओळखले पाहिजे. त्यामुळे या काळात कोणालाही जाणिवपुर्वक त्रास देवू नका ! कोणाशी भांडण करु नका ! कोणवरती अन्याय करु नका ! हा काळ अधिकार गाजविण्याचा नसून तो माणवी समाजाची सेवा करण्याचा आहे. त्यामुळे तुम्हाला जमेल तशी इतरांना मदत करा, आपल्या शेजापाजारी कोण उपाशी झोपला नाही पाहिजे याची काळजी घ्या. गोरगरीबांना मदतीच हात द्या. ज्यांना रोजगार नाही त्यांना रोजगार उपल्बध करुन द्या, बाहेरील कोणी आपल्या गावात आला तरीही त्याच्याशी उपरेपणाने वागू नका, माणसुकी जिवंत ठेवा. ज्याप्रमाणे आपण आपल्या गावात अडकलेल्या कोळसा कामगारांना मदत करुन माणुसकीचे एक जिवंत उदाहरण जगासमोर ठेवले होते. अगदी तशाच पद्दतीने इतरांनाही मदत करा. माणुसकीची, सहकार्याची भिंत उभी करा… मनात जिंकण्याची उर्मी असेल तर पायात धावण्याची गती येते. मात्र त्यासाठी प्रयत्नं करावे लागतात. माणसाला त्यासाठी प्रेरणा मिळण्याची आवश्यकता असते. रेल्वे इंजिनाला त्याचे लक्ष गाठायचे असते. त्यामुळे ते धावत असते. परिणामी रेल्वेच्या डब्यांनाही गती येते. आणि रेल्वे सुखरुप ठरलेल्या ठिकाणी पोहचते. तद्वतच आपणही आपले लक्ष ठरविले पाहिजे. कोरोनाचे समुळ उच्चाटनं हे आपले लक्ष आहे. गावातून कोरोनाला हद्दपार करणे हे आपले लक्ष आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्नं करायचे आहेत. हे सदैव लक्षात राहू द्या. आज समोर अंधार दिसत असला तरी त्यापलिकडे उजेड आहे. हे लक्षात ठेवा…! पण आपल्यालाही अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची ओढ लागली पाहिजे. केवळ अंधाराला शिव्या – शाप देण्यामुळे अंधार नाहीसा होणार नाही. कोणीही नेता होणार नाही. तर अंधाराला शिव्या – शाप देण्याऐवजी जो स्वतःहून पुढे येतो आणि प्रकाशाचा शोध घेतो आणि सर्वांना प्रकाशात घेवून जातो. तोच पुढे नेता होतो. हे नेतृत्व करणा-यांनीही लक्षात घेतले पाहिजे. ज्याला सार्वजनिक कार्य करायचे आहे. त्याच्या डोक्यावर बर्फाची लादी, ओठावर खडीसाखर आणि पायाला चक्र बांधलेले असले पाहिजे. म्हणून सार्वजनिक कार्य करताना आपल्या बोलण्यामुळे कुणाचेही अंतःकरण दुखावेल असे बोलू नये. संबंधित कार्यकर्त्याच्या किंवा त्या नेत्याचा अंगी स्थितप्रज्ञता असली पाहिजे. स्तुती किंवा निंदा यांनी त्याचे चित्त विचलित होता कामा नये. त्याचा चेहरा नेहमी हसतमुख असला पाहिजे. हे सार्वजनिक कार्यकर्त्यांनीही यानिमित्ताने लक्षात घेतले पाहिजे. जहाज पाण्यात चालते पण जहाजामध्ये पाणी चालत नाही. तद्वतच एकेमेकांच्या मनामध्ये जळमटं कायमं ठेवून ही लढाई आपल्याला जिंकता येणार नाही. त्यामुळे एकमेकांच्या मनात असलेली एकदुस-याबद्दलची सारी जळमटं काढून टाकूया आणि आपण सर्वजण या उधाणंलेल्या समुद्रातून आपले जहाज पैलतीरी नेवूया. आपले जहाज या जळमटांच्यामुळे, एकमेकांचे हेवेदावे, मत्सर, तिरस्कार यामुळे बुडणार नाही. याची काळजी घेवूया..! आणि मला खात्री आहे की, हे आपण सहज करु शकतो. त्यामुळे कोरानाचा अंत होणार आहे. माणवी वंशाच्या मुळावर उठलेल्या या आजाराला त्याचे तोंड काळे करावे लागणार आहे. आणि कुडणूरकर त्यामध्ये सर्वात पुढे असतील. सा-या जगामध्ये कुडणूरचा जयजयका होईल. कारण जे – जे आम्ही मनातून घेतो. ते – ते आम्ही तडीस नेतो. आणि कोरोनाचे समुळ उच्चाटन हा विषयदेखील आम्ही आता मनातून घेतला आहे. त्यामुळे भाग कोरोना भाग…! तेरा बाप आया है…!! कुडणूर का माहौल लौट आया है. वीर हनुमान की शक्ती आपने साथ लाया है…! बांधवांनो, मी जरी गावचा माजी सरपंच असलो तरीही एक पत्रकार म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात नोकरी करतोय. त्यामुळे या काळात मलाही कोरोनासंदर्भातील असंख्य बातम्या कराव्या लागत आहेत. वार्तांकनासाठी २४ तास सतर्क रहावे लागते. जीव धोक्यात घालूनच जिल्हाभर फिरुन हे काम करावे लागते. त्यामुळे या काळात अनेकांशी संपर्क येतो. अनेकांच्या अडचणी सोडविण्याचे भाग्य मला मिळते. माझी ही माणवसेवा २४ तास सुरुच आहे. पहिल्या लाटेत मी गावचा सरपंच होतो. त्यावेळी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे, प्रयत्नामुळे, पाठिंब्यामुळे गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. एकही रुग्ण आढळला नाही. की, एकही मृत्यू झाला नाही. त्याशिवाय मी विकासकामांची गंगाही वाहती ठेवली होती. त्यामुळे गावात अनेक विकासकामं झाली. अनेक कामं मंजूर आहेत. मात्र मी आता सरपंच नाही. मला नोकरीनिमित्त कोल्हापूरात रहावे लागत आहे. तरीही राहिलेली सर्व विकासकामें पुर्ण करण्यासाठी मी बांधील आहे. अपुर्ण कामे पुर्ण करण्यासाठी माझे सदैव प्रयत्नं सुरु आहेत. मी यासाठी नेहमी आपल्यासोबत आहे. एक पत्रकार म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात माणवी समाजाची सेवा करताना, मला सर्जजण सारखेच वाटतात. कोल्हापूरही माझेच गाव आहे. इथल्या माणसांची सेवा करणे हा देखिल माझा धर्मच आहे. या पृथ्वीतलावरचा प्रत्येक माणूस सुखी असला पाहिजे. ही माझी भुमिका आहे. त्यासाठीच माझी वाणी अन् लेखणी मी झिजवत आहे. म्हणून, कोल्हापूरात असलो तरीही तुमच्या सेवेत मी कायम आहे. या लढाईत तुमच्यासोबत आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. कोणतीही आणि कसलीही अडचण आली तर नेहमीप्रमाणे माझा फोन नंबर आपल्याकडे आहेच…. मा. श्री. अमोल पांढरे – माजी सरपंच, ग्रामपंचायत – कुडणूर, मो. ९३७०८४५३९०, ८३२९०३९६८४

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर