माळशिरस पं.स. उपसभापती निवडीत विरोधी गटाला आणखी धक्का! मोहिते पाटील गटाचे प्रताप पाटील बिनविरोध

संजय हुलगे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस: 

माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापतीपदासाठी आज ( सोमवार ) झालेल्या निवडणूकीत मोहिते पाटील गटाने विरोधी गटाला जोरदार धक्का देत १७ सदस्यांच्या पाठबळावर  बोरगांव पंचायत समिती गणाचे सदस्य प्रताप पाटील यांना उपसभापतीपदी  बिनविरोध विजयी केले . माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने  उपसभापतीपदाच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी जाहीर केला . तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली  पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मीता पाटील व सहाय्यक शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात सोमवार  दि .१७ एप्रिल रोजी उपसभापतीपदासाठी निवडणुक घेण्यात आली. सकाळी १०  वाजता उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल करणे , दुपारी २ वाजता अर्जाची छाननी व २ . १५ वाजता अर्ज माघारी घेण्याची वेळ व त्यानंतर निवडणूक असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मोहिते पाटील गटाकडून  प्रताप पाटील यांनी तर विरोधी  गटाकडून अजय सकट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला  होता. माळशिरस पंचायत समितीमध्ये मोहिते पाटील गटाचे  १४ तर विरोधी गटाची  ८ सदस्य संख्या होती.परंतु राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यशैलीमुळे प्रभावित होवून विरोधी गटाचे अनिल जाधव,विजया धाईंजे व संगीता शेळके या तीन विरोधी सदस्यांनी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहिते पाटील गटात प्रवेश करीत मोहिते पाटील गटाचे  सदस्य प्रताप पाटील यांना पाठींबा दिल्याने  पंचायत समितीमध्ये मोहिते पाटील गटाची सदस्य संख्या १७ झाली. त्यामुळे उपसभापतीपदाच्या  निवडणूकीतून विरोधी गटाचे अजय सकट यांनी  माघार घेतली व मोहिते पाटील गटाचे  प्रताप पाटील हे बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. या निवडीने तालुक्यातील विरोधी गटाला जोरदार धक्का बसला. 
शिवरत्न बंगल्यावर प्रताप पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत  त्यांचा  फेटा , पुष्पहार व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला . यावेळी सत्यप्रभादेवी मोहिते पाटील , सभापती शोभा साठे , माजी सभापती वैष्‍णवीदेवी मोहिते-पाटील , माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील , किशोर सूळ, सदस्य  गजानन एकतपुरे, मानसिंग मोहिते , नानासाहेब नाईकनवरे , अनिल जाधव , विजया धाइंजे , रेणुका माने-देशमुख , ॲड.हसीना शेख , हेमलता चांडोले , लतिका कोळेकर , विद्या वाघमोडे,   ताई महाडिक , संगिता शेळके आदी उपस्थित होते .