विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी मोहीम ग्रामीण भागातही राबवा!

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासनाने खबरदारीचा उपाययोजना म्हणून लॉकडाऊन जारी केले. मात्र, काही अतिउत्साही मंडळी ग्रामीण भागात विनाकारण फिरत असून, त्यांची रस्त्यावरच कोरोना चाचणी करून बाधितांना थेट कोरोना रुग्णालयात दाखल करावे. त्यामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या गावातही मदत होऊ शकते, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाउन,संचारबंदी, जमावबंदी अथवा खबरदारी उपायोजना याबाबत प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. तरीही काही अतिउत्साही मंडळींवर त्याचा परिणाम होत नाही. अशा अतिउत्साही मंडळींना ठिकाणावर आणण्यासाठी आता रस्त्यावरील कोरोना चाचणीचा उपक्रम ग्रामीण भागातही राबविल्यास कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यास मोठी मदत होऊ शकते, अशी मागणी होत आहे.बाधित आल्यास त्याची थेट कोरोना हॉस्पिटल अथवा केअर सेंटरमध्ये रवानगी करावी. ग्रामीण भागात सर्वत्र ही मोहीम प्रभावीपणे राबविल्यास नक्कीच कोरोना नियंत्रणासाठी मदत होऊ शकतो, त्यामुळे प्रशासन यासाठी पुढाकार घेणार का? हा खरा प्रश्न आहे.गत काही दिवसांपासून शहरापेक्षा ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होण्यापेक्षा वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता खऱ्या अर्थाने कोरोना नियंत्रणासाठी प्रभावीपणे व सक्तीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. त्याशिवाय ग्रामीण भागात फोफावलेला कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येणे अशक्य आहे.