संचारबंदीचा भाजीबाजाराला फटका; उलाढाल निम्म्यावर !
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
कोरोनाच्या संकटामुळे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता आठवडा बाजार बंद आहे.भाजीपाला बाजारालाही वेळेचे निर्बंध आहे. त्याचे परिणाम भाजी बाजारात पहायला मिळत आहे. येथे विक्रीला येणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची उलाढाल निम्म्यावर आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.संचारबंदी असल्याने सर्वच व्यवसायांवर निर्बंध आले आहेत. भाजीपाल्याच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील आठवडा बाजार 15 मे पर्यंत बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाला समाधानकारक दर मिळत नाही. परिणामी, शेतकरी हैराण झाला आहे. शहरातील भाजी बाजार सुरू आहे; पण त्यालाही वेळेचे बंधन आहे. शहरात विक्रीला परवानगी दिली आहे. त्यालाही सकाळी ७ ते ११ पर्यंत वेळेचे बंधन घातले आहे. त्याचबरोबर गावोगावचे आठवडा बाजार बंद आहेत. त्यामुळे उत्पादन केलेला माल घ्यायला व्यापारी उत्सुक नाहीत. खरेदी केला तर तो विकायचा कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या सगळ्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे.दर चांगला मिळत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाचा तोडाच केलेला नाही किंवा माल काढलेला नाही. व्यापाऱ्यांना फोन करून माल घेऊन येऊ का? असे विचारले असता, मालाला ग्राहक नाही; चांगला दर मिळत नाही, असे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पिकवलेल्या या मालाचे करायचे काय? या विचाराने शेतकरी चिंतेत आहे.


संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा