आटपाडीत आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न

मोहनराव पुजारी 

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

कोरोणा रुग्णांची संख्या वाढू लागल्याने कडक उपाययोजना करण्यासाठी आज शुक्रवार दिनांक ३० एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक तहसिलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, आटपाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांत कदम व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व आटपाडीच्या सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत येथे संपन्न झाली. 

आटपाडी तालुक्यामध्ये कोरोणा रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे कोरोणाच्या अनुषंगाने असणाऱ्या प्रतिबंधक उपायांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश तहसीलदार सचिन मुळीक यांनी या बैठकीत दिले.

काही नागरिक विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्यास अगर कोरोणाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्यास संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी या बैठकीत सांगितले. 

कोरोणा आजाराचा कहर कमी करण्यासाठी, आजपासून जे नागरिक कोरोणा पाॅझिटीव्ह येतील,त्यांना आजपासून त्यांच्या घरी न ठेवता, त्या नागरिकाच्या आजाराची तीव्रता पाहून त्यांच्या निवासस्थानापासून जवळ असलेल्या शाळा-कॉलेजमध्ये, अगर आयटीआय काॅलेज, जवळ असलेल्या शासकीय वस्तीगृहामध्ये अगर दवाखान्यामध्ये विलगीकरणामध्ये  ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला.त्यामुळे आटपाडी गावातील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सर्व सरकारी व खाजगी शाळा, हायस्कूल व कॉलेज ताब्यात घेण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समितीने तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला.आटपाडी ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 6 वार्ड आहेत. त्यामुळे वार्डनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या. वार्डनिहाय समितीमध्ये त्या- त्या वार्डातील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामपंचायत कर वसुली क्लार्क, कृषी सहाय्यक व रेशनिंग दुकानदार यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच व उपसरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली एकमेकांमध्ये सुसंवाद साधून कोरोणा आजारावर मात करण्याचे ठरले. 

या बैठकीला अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. धनंजय लक्ष्मणराव पाटील, उपसरपंच प्रा.डॉ.अंकुश कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी, प्रकाश मरगळे, विजय पाटील,चंद्रकांत हाके, प्रदीप लांडगे, रावसाहेब सागर, राजेन्द्र बालटे, उमाकांत देशमुख, सर्जेराव राक्षे,मधुकर माळी, तलाठी सुधाकर केंगार, ग्रामसेवक दत्तात्रय गोसावी, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रतिनिधी, आरोग्य सेवक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.