अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
तालुका प्रशासन,आरोग्य विभाग व जत नगरपरिषदेने जत शहरातील सर्व व्यावसाईक,भाजीपाला विक्रेते व फळविक्रेते यांची कोरोना टेस्ट करावी अशी मागणी जत शहरवासियांतून करण्यात येत आहे. जत शहरासह तालुक्यातील कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांची दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असलेली संख्या विचारात घेऊन तालुका प्रशासन ,आरोग्य विभाग व जत नगरपरिषदेने जत शहरातील सर्व व्यावसाईक, भाजीपाला विक्रेते व फळविक्रेते यांची कोरोना टेस्ट करावी अशी मागणी जत शहरवासियांतून करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत शहरासह तालुक्यातील गावोगावी कोरोनाचे पाॅझीटीव्ह रूग्ण आढळून येत आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेली ही कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या जतकरांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. प्रशासन कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या परिने प्रयत्न करीत आहे.परंतु नागरिक मात्र कोरोनाचे कोणत्याही नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत तर कोरोना कालावधीत ही बिनकामाचं फिरणारांची वर्दळ पहावयास मिळत आहे. जत शहरात बहुतांशी नागरिक हे कोरोना नियम पायदळी तुडवित असताना दिसतात. तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) पालन न करणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, जमावबंदीचा आदेश धुडकावणे असे वर्तन करीत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्यातच जत नगरपरिषद ही कोरोना काळात फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.जत नगरपरिषद कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही उपाययोजना राबविताना दिसत नाही. जत नगरपरिषद सत्ताधारी व विरोधक त्याचप्रमाणे दोन्ही बाजूचे नगरसेवक यांच्यामध्ये वारंवार खटके उडताना दिसत आहेत.जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे वैद्यकिय रजेच्या नावाखाली गेले तीनचार महिने रजेवर गेल्याने नगरपरिषदेच्या प्रशासनाचा सावळा गोंधळ चालू आहे. ‘आंधळ दळतंय आणि कुत्रं पिठ खातंय’ अशी अवस्था जत नगरपरिषदेची आहे.कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जत नगरपरिषदेला प्रशासनाने कायमस्वरूपी असा मुख्याधिकारी द्यावा अशी अपेक्षा जत शहरवासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जत शहरातील कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस वाढत असलेली रूग्णसंख्या विचारात घेता प्रशासनाने जत शहर कंटेन्टमेंट झोन म्हणून जाहीर करून जत शहरातील सर्वच व्यवसाईक,भाजीपाला व फळविक्रेते यांची कोरोना टेस्ट करणे ही एक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना होऊ शकते. यापूर्वीही जत शहरातील बहुतांशी भाजीपाला, फळविक्रेते व प्रमुख व्यापारी हे कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत.भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते व विविध व्यावसाईक हे कोणत्याही कोरोना नियमांचे पालन करीत नाहीत, त्यामुळे जत शहरातील कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली दिसत आहे. जत शहरातील कोरोना नियंत्रणात आणावयाचा असेल तर तालुका प्रशासन, जत नगरपरिषद व आरोग्य विभागाने शहरातील सर्वच व्यावसाईक, भाजीपाला व फळविक्रेते यांची त्वरित कोरोना टेस्ट केली पाहीजे, अशी मागणी ही जत शहरवासियांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर