दहावीची परीक्षा रद्द

सीबीएसई,आयसीएसई पाठोपाठ महाराष्ट्र  राज्य मंडळाचीही दहावीची परीक्षा रद्द,
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे निर्णय

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई:
सीबीएसई बोर्डाची दहावीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.त्यापाठोपाठ आय सी एस ई चीही दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील  राज्य शिक्षण मंडळाचीही दहावीची परीक्षा  रद्द करण्यात आल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल लावण्यात येईल असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. मात्र बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. दरम्यान सीबीएसई बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी सोशल मीडियावरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.मात्र बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिस्थिती गंभीर आहे. अशा वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलावून त्यांची परीक्षा घेणे धोक्याचे ठरू शकते. या निमित्ताने होणाऱ्या प्रवासात विद्यार्थ्यांना कोरोनाचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या बाबीचा विचार करून केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्याचा व बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेऊन गुण दिले जातील.केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी सीबीएसई बोर्ड अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे एक कार्यप्रणाली ठरवेल. त्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण देणार असल्याचे जाहीर केले.
कामगिरीच्या आधारे दिलेल्या गुणांविषयी ज्यांना हरकत असेल त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र ही परीक्षा कधी होणार तसेच बारावीच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक या संदर्भातील निर्णय १ जून २०२१ रोजी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जाहीर केले जातील. सीबीएसई बोर्डाचे अधिकारी १ जून २०२१ रोजी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन आयसीएसई बोर्डानेही दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मूल्यमापनाचे पर्यायी निकष वापरून किंवा नंतर इच्छेनुसार लेखी परीक्षा देण्याचे पर्याय उपलब्ध केले आहेत. मागील आठवड्यात दहावी व बारावीच्या परीक्षांना स्थगिती दिली होती.आता मात्र आयसीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे.
दरम्यान सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी सोशल मीडियावर बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात,अशी मागणी करत आहेत. विद्यार्थ्यी आता Cancel CBSE 12th Exam हा ट्रेंड चालवत आहेत. तर, काही विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी करत आहेत. मोठमोठ्या देशांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होत आहेत.
सीबीएसई बोर्डाचे बारावीचे विद्यार्थी आणि पालक चिंतीत आहेत. सीबीएसई बोर्डाकडे ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा आयोजित करण्याचा पर्याय आहे. मात्र, ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये वीज पुरवठा खंडित होणं, ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क,इंटरनेट स्पीड, मोबाईल, लॅपटॉपची उपलब्धता, अशा समस्या आहेत.