प्रशासनाचा हलगर्जीपणा,कठोर निर्बंधाची गरज
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत शहरासह तालुक्यातील कोरोनाच्या वाढीला प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असून कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लावावेत,अशी अपेक्षा जत शहरवासियांकडून करण्यात येत आहे.
जत तालुक्यातील बिळूर या गावात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती व वाळेखिंडी येथील चार व्यक्ती नुकत्याच कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आल्या असून एकाच दिवसात कोरोनाचे नऊ रूग्ण व दोन दिवसातील कोरोना रूग्णांची संख्या ही पंधरावर जाऊन पोहचली आहे.
जत शहरासह तालुक्यात कोरोना महामारीने परत शिरकाव केला असला तरी प्रशासनाला याचे कोणतेच गांभीर्य दिसत नाही.प्रशासनाने कोरोनाचे पार्श्वभूमीवर फक्त विविध व्यवसाईकांना कोरोना प्रतीबंधासाठी नोटीस देण्याचेच काम केले आहे. परंतु प्रत्यक्षात कारवाई करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
जत महसुल प्रशासन तसेच पोलीस व जत नगरपरिषदेने कोरोनाचे पार्श्वभूमीवर कठोर कारवाई करणे अपेक्षित असताना जत शहरात मात्र प्रशासन कोरोना बाबतीत दक्ष दिसत नाही. जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत विविध व्यावसाईक तसेच फळ विक्रेते व फेरीवाले हे कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.
तोंडाला मास्क न लावता व्यावसाईक हे व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच सामाजिक अंतर ठेवणे हे बंधनकारक असतानाही ते त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.एकाही व्यावसाईकाकडे सॅनिटायझर दिसून येत नाही. ही झाली व्यवसाईकांची स्थिती.तर जत शहरवासियांकडूनही कोरोनाचे बाबतीत कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. उलट त्या नियमांचे उल्लंघन मात्र वरचेवर होताना दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचे पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचेवतीने संपूर्ण जिल्ह्यात पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई केली असताना व तसा आदेशही सबंधितांना दिला असतानाही जतचे महसुल प्रशासन,पोलीस प्रशासन,नगरपरिषद यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे.
जत शहरासह तालुक्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने फक्त आदेश न देता प्रत्यक्षात कारवाईला सुरूवात केली पाहीजे तरच कोरोना नियंत्रणात येईल अन्यथा कोरोना वाढल्याशिवाय राहणार नाही.
जत शहरातील मंगल कार्यालये ही कोरोनाचे बाबतीत असलेल्या सर्व नियमांचे पालन करीत असली तरी जत शहराबाहेर असलेल्या मंगल कार्यालयात कोरोनासंदर्भातील नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असून याला येथील कोरोना प्रतिबंधात्मक नियंत्रण समितीचे पथकच पूर्णतः जबाबदार आहे.
जत शहरासह तालुक्यातील कोरोनावाढीला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लावणे हाच एकमेव पर्याय आहे,अशी अपेक्षा जत शहरवासियांकडून करण्यात येत आहे.


संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर