मागेल त्याला शेततळे योजना सुरू करण्याची कामगार सेनेकडून कृषिमंत्र्यांकडे मागणी :दिनकर पतंगे

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

जतचे आमदार विक्रमदादा सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कृषी विभागाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे महाराष्ट्र कामगार सेनेकडून मागेल त्याला शेततळे योजना सुरू करण्याची मागणी लेखी स्वरुपात करण्यात आली आहे.त्याचबरोबर शेततळ्याचे मापदंड दीड लाखापर्यंत करणेबाबत विनंती करण्यात आली आहे. कृषी विभागाची पुनर्रचना करून महसूल विभागाप्रमाणे मंडळ कृषी कार्यालय सुरू करावे अशी मागणी करण्यात आली. तसेच कृषी विभागातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत,जतसारख्या दुष्काळी भागात जत- येळवी रस्त्यावर वन विभागाकडे पडून असलेली जमिनीवर कृषी विद्यापीठामार्फत कोरडवाहू संशोधन केंद्र सुरू करावे अशी मागणी करण्यात आली.
जत तालुका हा विस्ताराने मोठा असल्याने 25 किलोमीटरच्या परिसरामध्ये एक पर्जन्यमापक यंत्र बसवावे,त्यानुसार प्रत्येक गावात पीकनिहाय विमा संरक्षण मिळावे,एन एच एम योजनेअंतर्गत सामुदायिक शेततळे योजना वरदान ठरणारी आहे,ती सुरू करावी.त्याचबरोबर खरीप,रब्बी आणि उन्हाळी बियाण्याची उगवणशक्ती ही तपासणी गुण नियंत्रण विभागामार्फत राज्यस्तरावरून करण्यात यावी,अशा प्रमुख मागण्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कृषिमंत्री यांच्याकडे करण्यात आल्या.
यावेळी कृषी मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र कामगार सेना तालुका प्रमुख सुरेश घोडके,विभाग प्रमुख दत्ता कोरे,शाखाप्रमुख अर्जुन भोसले, उपतालुकाप्रमुख श्रीशैल पाटील व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी,कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचे व विविध पिकांचे,अवजारांचे विविध योजनांचे शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले.