शेतकऱ्यांने भरले २ लाख वीज बिल;महावितरणच्या कृषी वीजबिल सवलत योजनेला प्रतिसाद

सतिश पारसे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ पिलीव:

शेती आणि वीज हे एक अतूट नाते आहे.शेती करण्यासाठी विजेची गरज असते.म्हणून महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना अखंडपणे वीज पुरवठा देणे आणि इतर विजेची कामे होण्यासाठी शेती पंपाच्या वीज बिलाची थकीत रक्कम वसूल करणे चालू असून शेतकऱ्यांना दिलासा देणारी महावितरणची योजना असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली थकीत कृषी वीज बिले भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरण पिलीव शाखाचे सहाय्यक अभियंता शरद मिसाळ यांनी केले आहे.
गुरुवारी पिलीव येथील प्रगतशील बागायतदार, वीजग्राहक आनंदराव बाबुराव जाधव यांनी आपली एकूण 7 बिलाची रक्कम 2 लाख, 16 हजार रुपये भरून या योजनेत सहभाग घेतला आहे.महावितरण पिलीव शाखा कार्यालयाच्या अंतर्गत एकूण 13 गावे असून कृषी पंपाचे 5531 वीजग्राहक आहेत.यांची एकूण 70.93 कोटी थकीत वीजबिले असून मिळणाऱ्या लाभाची रक्कम 26 कोटी, 1लाख,64 हजार रुपये आहे. या योजनेची माहिती सर्व कर्मचारी शेतकऱ्यांना भेटून देत असून यासंदर्भात शंका असल्यास शाखा कार्यालयात भेट द्यावी असे सहाय्यक अभियंता शरद मिसाळ यांनी सांगितले.
“आम्ही नियमीत वीज बिले भरत असतो. आतापर्यंत आम्हाला कुठलीही सवलत मिळाली नाही.शासनाने थकीत बिले भरण्यासाठी योजना काढण्यापेक्षा नियमित वीज बिले भरण्यासाठी योजना काढून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.”
आनंदराव जाधव,शेतकरी