अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
जत तालुक्यासह शहरातून गायब झालेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तर कोविड सेंटर बंद करण्यात आल्याने कोरोना बाधितांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बंद केलेली कोविड सेंटर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्वरीत सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष संजयराव कांबळे यांनी आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने कोरोनाचा मोठ्या प्रमाणात झालेला प्रसार रोखण्यामध्ये यश मिळवले असले तरी अजून कोरोना ही महामारी पूर्णपणे संपलेली नाही. तरीही प्रशासनाने राज्यातील कोविड सेंटर बंद करण्याचा घाईघाईत निर्णय घेतला आहे. हा निर्णय किती घातक ठरेल हे येणारा काळच ठरवेल.
कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जत तालुक्यातील गुड्डापूर येथिल श्री. धानम्मा देवीची व जत येथील श्री. यल्लमा देवीच्या यात्रेसह अन्य यात्रा व उरूस रद्द करण्याचे आदेश दिले असले तरी सद्या होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकात होत असलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते छाननी व अर्ज माघारी घेणे या प्रक्रियेवेळी होणारे लोकांच्या गर्दीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. उमेदवारांसह त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांनी तोंडाला मास्क न लावणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, सॅनिटाइझरचा वापर न करणे अशा लोकांवर काहीही कारवाई केली नाही.
जत तालुक्याचा विचार केला तर जत तालुक्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या ही २२००च्या जवळपास गेली आहे.तर कोरोनाने ६६ लोकांचा बळी गेला आहे. त्यातच तालुक्यातून कोरोना गायब झाला आहे,असे वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
चार दिवसातच तालुक्यातील १६ लोक कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. यामध्ये एका राष्ट्रीयकृत बँकेच्या मॅनेजरचा समावेश असून एका सेवानिवृत्त बँक अधिकारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींचा समावेश आहे. तर एका सराफ व्यावसाईकासह त्याची पत्नीही कोरोना पाॅझीटीव्ह आहे. कोरोना पाॅझीटीव्हमध्ये व्यापारी, इस्टेट एजंट यांच्या कुटुंबातील लोकांचा समावेश असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोरोनावर जरी लस उपलब्ध झाली असली तरी लोकांनी अजून काही काळ तरी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे त्यांच्या दृष्टीने सुरक्षेचे ठरणार आहे.महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे ब्रिटनमधून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन हा महाराष्ट्रात आला असून या नवे स्ट्रेनचे आठ रूग्ण महाराष्टातील पुणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यात आढळून येत असल्याने राज्य सरकारपुढे या नव्या स्ट्रेनचे मोठे संकट उभे राहीले आहे.
हा नवा स्ट्रेन महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पोहोचू नये याची राज्य सरकारने काळजी घेतली पाहिजे व ज्या-ज्या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण परत मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत, अशा ठिकाणची कोविड सेंटर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पूर्ववत त्वरित सुरू करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला द्यावेत अशी मागणीही संजय कांबळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी डाॅ.अभिजीत चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संजय साळुंखे, राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील, राज्याचे कृषी व सहकार राज्य मंत्री डाॅ.विश्वजित कदम, उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे, तहसिलदार सचिन पाटील, जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोज देसाई व तालुका आरोग्य अधिकारी संजय बंडगर यांना पाठविल्या आहेत.


संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर