
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
पदवीधर मतदार संघातून पुणे विभागातून भाजपाने जि.प.चे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी ही उमेदवारी जाहीर करताना भाजपाने सांगली जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला विचारात घेतले नाही. त्यामुळे पदवीधर निवडणूकीपासून रिपाइं अलिप्त राहण्याचा विचार करीत आहे अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे यांनी दिली आहे.
कांबळे म्हणाले की, यावेळची पदवीधर निवडणूक महत्वपूर्ण ठरणार आहे. या निवडणुकीत सर्व पक्षानी आप-आपले उमेदवार घोषीत केले आहेत. ही निवडणूक प्रथमच अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची होणार असल्याने या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपाबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची राष्ट्रीय पातळीवर युती असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर नेतेमंडळी हे सन्मानाची वागणूक देतात.
परंतु सांगली जिल्ह्यातील भाजपाचे नेतृत्व हे आमच्या पक्षाचा वापर निवडणुकीच्या कामासाठीच करून घेत असून निवडणूका संपल्या की ते आमच्या पक्षाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. यामुळे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे.
सांगली जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व आम्हाला कोणत्याही निर्णय प्रक्रीयेत विचारात घेत नाहीत. जिल्हास्तरावरील तसेच तालुकास्तरावरील निवडीत आम्हाला जाणीवपूर्वक डावलले जाते. खासदार निधी वाटप करताना आमच्या पक्षाला विचारात घेतले जात नाही.जिल्हा परिषद,पं.स.,बॅंका,मार्केट कमिटी आदि ठिकाणी आम्हाला डावलले जात आहे. त्यामुळे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय होत आहे.
भाजपाने आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर करताना आपला मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला विश्वासात न घेता जि.प.चे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची पुणे विभागाचे पदवीधर निवडणूकीत उमेदवार म्हणून नांव जाहीर केले असून यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली सर्व पदाधिकारी,सदस्य व कार्यकर्ते नाराज झाले असून या निवडणुकीत आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही संग्रामसिंह देशमुख यांना कोणत्याही प्रकारे सहकार्य करणार नाही असेही कांबळे म्हणाले.
पुणे पदवीधर निवडणूकीत उमेदवार म्हणून संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी या निर्णय प्रक्रियेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली यांना विचारात न घेतल्याने याबाबत आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले यांच्याकडे तक्रार केली असून पुणे पदवीधर संदर्भात जो काही निर्णय घेण्याचा असेल ते आठवले घेतील असेही कांबळे म्हणाले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन