सोयाबीनचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे घोषित करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या

आ.अभिमन्यू पवार यांची कृषीमंत्र्याकडे मागणी 

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/औसा:

 औसा विधानसभा मतदारसंघासह लातूर जिल्ह्य़ातील खरिप हंगामातील पिकांचे आतोनात नुकसान झाले असून यामध्ये सोयाबीन पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी लातूर येथे झालेल्या आढावा बैठकीत आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. 

   कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली ‘पाऊस व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आणि कृषीविषयक योजनांचा’ आढावा बैठक लातूर येथे झाली. या बैठकीस उपस्थित राहून औसा मतदरसंघासह लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल आ.अभिमन्यू पवार यांनी मांडून पेरलेले बहुतांश बी उगवले नसल्याने दुबार व तीबार पेरणी करावी लागली, पावसाने उघाड दिल्यामुळे उत्पादनात घट आली, पुन्हा त्यात रोग पडला आणि या सगळ्यातून वाचलेलं अतिवृष्टीमुळे हातचं निघून गेलं आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील  सोयाबीनचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे घोषित करून शेतकरी सरसकट मदत द्यावी अशी आग्रही विनंती कृषीमंत्री  दादाजी भुसे यांच्याकडे केली.

           यावेळी नियमित कर्ज भरणार्‍या शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहनपर घोषित केलेले ५० हजार रू अनुदान देण्यात यावे, मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, शेततळ्यांची प्रलंबित देयके देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा मागण्या करून पोखरा योजनेअंतर्गत सामुहिक शेततळे घटकांचा पुनश्च समावेश करण्यात यावे, यांत्रिकीकरण योजना अंतर्गत महा पोर्टल डीबीटी वर शेतकऱ्यांचे अर्ज डाऊनलोड होत नसल्यामुळे शासनाने आॅफलाईन अर्ज स्वीकारावेत व रेशीम उद्योग योजना पोखराच्या धर्तीवर कृषी विभागामार्फत राबविण्यात याव्यात अशा कृषीविषयक सुधारणाही सुचवल्या.दरम्यान काही दिवसापुर्वी आ.अभिमन्यू पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघासह लातूर जिल्ह्य़ातील झालेल्या पिक नुकसानीची तातडीने मदत मिळावी यासाठी मतदारसंघातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून याबाबत आढावा बैठक घेतली होती.यानुसार हि सगळी परिस्थिती लातूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडून याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे हि व्यथा मांडली होती यानंतर कृषीमंत्री दादाजी भुसे यांची विधीमंडळाच्या अधिवेशना दरम्यान मुंबई येथे भेट घेत या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. लातूर येथे झालेल्या कृषी मंत्र्यांच्या आढावा बैठकीत उपस्थित राहून आ.अभिमन्यू पवार यांनी हा मुद्दे पुन्हा मांडून जिल्ह्यात सोयाबीनचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे घोषित करुन शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी हि मागणी केली आहे. या बैठकीला राज्यमंत्री  संजयजी बनसोडे, उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आ. बाबासाहेब पाटील, कैलास पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, औसा च्या तहसीलदार शोभा पुजारी,  कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.