अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान; सर्व्हे अंतिम टप्प्यात

सुभाष मोरे/ बुलडाणा, प्रतिनिधी:
गेली दोन वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसत असल्याने शेतक-यांचे फार मोठे नुकसान होत आहे ब-याच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने नदी,नाले व धरणाने धोक्याची पातळी गाठल्याने अनेक गावे बाधित झाली.अनेक पिके पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी जमिनी खरडुन गेल्या. उडीद व मुगाच्या शेंगाना कोंब आले. कपाशीच्या मुळ्या सडल्याने झाडे वाळुन गेली. जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार,पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हयातील सर्व तहसिलदार यांनी तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांना दिले असून २९ आॅगस्टपर्यंत पंचनामे सादर करण्याचे आदेशात सुचित केले.परंतु सध्या पण पाऊस सुरूच असल्याने पंचनामे करण्यात अडथळे येत आहेत. तरीही पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.गेल्या दोन वर्षांपासून पाऊस शेतक-याचे हाती आलेले पिक हिराऊन घेत असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक-यांकडून होत आहे.