जत तालुक्यात भाजपमध्ये चैत्रवनव्यात ‘निवडणूक काहिली’!

माजी आमदार आता नरम,पण माजी अध्यक्ष गरम!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत भाजपा अंतर्गत वाद संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे माजी आमदार विलासराव जगताप यांची नाराजी दूर होताच, माजी तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी आयात उमेदवारांचा भाजपात प्रवेश घ्या, अन्यथा आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, असा पवित्रा घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.
सांगली मार्केट कमेटी निवडणुकीत सुनील पवारांची एन्ट्री झाली असून भाजपच्या उमेदवार यादीवर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष असलेले सुनील पवार यांनी फक्त संग्राम जगतापांचाच प्रचार करणार असल्याचे स्पष्ट करत,उमेदवारांसह पँनेल प्रमुखाच टेंशन वाढविले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीमधून आलेल्यांना कडाडून विरोध करत उमेदवारीसाठी भाजप पॅनेलमधून आलेल्यांनी प्रथम भाजपमध्ये जाहीर प्रवेश करावा,मगच त्यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची तलवार म्यान होताच सुनील पवारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीमधून आलेल्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, राष्ट्रवादीचे युवानेते मोहन उर्फ भैय्या कुलकर्णी,काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, काँग्रेसचे माजी सभापती संतोष पाटील यांनाच थेट सुनील पवार यांनी आव्हान देत त्यांचा प्रथम भाजपात प्रवेश घ्यावा, त्यानंतरच आम्ही प्रचार करणार अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत जतमध्ये पवारांमुळे पडलेला नवीन पेच पॅनेलला अडचणी आणू शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे.