

तर दुसरी महिला जखमी,दोन दुचाकीचा चुरा
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
झरे ता.आटपाडी येथे अति वेगाने आलेल्या ट्रकटॅंकरने दोन दुचाकीला व दोन महिलांना धडक दिल्याने एका महिलेचा यामध्ये मृत्यू झाला आहे तर दुसरी महिला जखमी झाली.तिच्यावर उपचार सुरु आहेत.दुचाकीचा खिळखिळा झाला आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, झरे येथील बिरदेव कृषी केंद्रासमोर रस्त्याच्या साईडपट्टीच्या बाजूला पारेकरवाडीचे मंगेश धोंडीराम दगडे हे दुचाकी लावून बिरदेव कृषी केंद्रामध्ये शेतीची औषधे आणण्यासाठी गेले होते. तर त्याच्या शेजारी गुरुदत्त इलेक्ट्रिकलचे दुकान आहे. याचे मालक सुरेश पवार हे पाली खंडोबाला जाण्यासाठी गाडी साफ करत होते व त्यांची पत्नी राणी सुरेश पवार ह्या रस्त्यालगत येऊन थांबल्या होत्या. त्याच्या शेजारी नारायण सकट यांचे वाघजाई बोरवेलचे दुकान आहे .यामध्ये प्रकाश जयवंत पवार व संगीता प्रकाश पवार वय वर्ष ४५ हे दोघे पती-पत्नी रा. तरसवाडी ता. खटाव हे चहा घेऊन घरातून बाहेर आले व बाहेर रस्त्यालगत रस्त्याच्या साईड पट्टीच्या बाजूला टीव्हीएस लुना लावली होती.
या टीव्हीएस लुनावरती बसण्यासाठी हे दोघी पती-पत्नी बाहेर आले होते. तोपर्यंत काही क्षणातच पश्चिमेकडून झरेच्या दिशेने अतिवेगाने ट्रकटँकर आला. ट्रकटँकरच्या ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानंतर पहिल्यांदा त्याने बिरदेव कृषी केंद्राच्यासमोर असणारी दुचाकी एम एस 10 सीसी 3077 या हिरोहोंडा गाडीला जोरात धक्का दिली. या धडकेत गाडी ट्रकटँकरच्या मागच्या टायरखाली पूर्णपणे दबली आहे.
त्यानंतर लगेचच पुढे दहा ते वीस फुटाच्या अंतरावर राणी सुरेख पवार या उभ्या होत्या. त्यांनाही ट्रकने उडवले. त्यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत. सध्या त्या दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत. तर पुढे वाघजाई बोरवेलच्या समोर टीव्हीएस लुना एम एच 1011 -सीए 3858 या गाडीजवळ महिला उभी होती. त्यांनाही ट्रकने उडवले, पंधरा ते वीस फूट उंच हवेमध्ये त्या उडाल्या व पुन्हा जमिनीवरती कोसळल्या. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर ट्रकटँकरच्या पाठीमागे डाव्या साईडला सहा चाके तर उजव्या साईडला सहा चाके अशी होती. त्यापैकी डाव्या साईडची दोन चाकाची जोडी ट्रकच्या जॉईडपासून निसटली व अतिवेगाने जाऊन सचिन राजमाने यांच्या दुकानाच्या समोरील व ब्रह्मचैतन्य चहा सेंटरच्या पाठीमागील दगडी भिंतीला जोरात धडकली. त्यामध्ये भिंत कोसळली, एवढ्या अति वेगाने टायर टँकरमधून सटकून गेले होते.
नशीब चौकामध्ये सका-सकाळी गर्दी नव्हती. त्यामुळे त्या टायरमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एवढे होऊनसुद्धा टँकरचालक कोणताही विचार न करता टॅंकर अतिवेगाने कराड-पंढरपूर हायवेने शेनवडी ता. माणच्या दिशेने घेऊन गेला. त्यानंतर गावातील तरुणांनी टू व्हीलर, फोर व्हीलरवर जाऊन टँकरचां पाठलाग करून पकडले व त्याला अढवले .त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.पोलिसांनी येऊन पंचनामा केला आहे.
कराड पंढरपूर महामार्ग आणखी कितीजणांचे जीव घेणार आहे.? याच महामार्गावर विभूतवाडी येथे सात ते आठ अपघात झाले. त्यानंतर आता झरेत झालेला अपघात यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला व दुसरी महिला जखमी झाली आहे. म्हणजे या महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देऊन गतिरोधक करणार आहे की नाही? हा गंभीर प्रश्न आहे. जर सार्वजनिक बांधकाम गतिरोधक करणार नसेल तर अपघातात झालेल्या सर्व मृत्यूची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या