चोपडी येथे होलार समाजाने पाडला नवा पायंडा!

रक्षाविसर्जनादिवशी स्मशानभूमीत वृक्षारोपण,भजनावळे कुटुंबानेही जपला आदर्श
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
चोपडी/सांगोला

सांगोला तालुक्यातील चोपडी येथील होलार समाजाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करून वृक्ष संगोपन करण्याचा नवा पायंडा पाडला आहे.सर्वांना पर्यावरणाच्या रक्षणाचा नवा आदर्श समाजाने घालून दिला आहे. आजही चोपडी येथील जनार्धन भजनावळे (गुरुजी) यांच्या पत्नी व समाधान जनार्धन भजनावळे यांची आई कै.सुभद्रा जनार्धन भजनावळे यांच्या रक्षाविसर्जनानिमित्त वृक्षारोपण करून विधी पार पाडून नवा पांडा व आदर्श जपला.
भारतीय संस्कृती व शास्त्र पुराणात वृक्ष-लता-वेलींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्व आता पर्यावरण शास्त्रामध्ये प्राप्त झाले आहे. शुद्ध हवेचा निर्मळ स्रोत म्हणून वृक्ष जगविख्यात आहे. आपणास मुक्तपणे, विनाशुल्क प्राणवायूची अनमोल देणगी वृक्षाच्या मदतीने मिळते.पर्यावरणाच्या संतुलनामध्ये वृक्ष अनन्यसाधारण भूमिका बजावतात. परंतु अलीकडील काळामध्ये वाढते शहरीकरण औद्योगीकरण रस्ते विकास व निवासासाठी जागा तसेच इंधन म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्षावर कुऱ्हाड चालवून परिसर दोडका केला जातो आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो. परिणामी तापमान वाढीसारख्या समस्यांना तोंड देऊन अन्य समस्या डोके वर काढत आहेत. संपूर्ण जनजीवन पर्यावरण साखळी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धनाची गरज आहे. त्याचबरोबर नव्याने वृक्ष लागवडीची ही गरज आहे. ही बाब आता जगन्मान्य झाली आहे.
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर केले जाणारे विधी समाज व्यवस्था तितकेच महत्वपूर्ण मानतात. रक्षा विसर्जना दिवशी पिंडदान व रक्षाविसर्जन यासारखे विधी करताना आता पर्यावरण पूरक व रक्षक विचारांची जोड आता मिळू लागली आहे. त्यातून मनस्वी समाधानही प्राप्त होत आहे. किंबहुना अलीकडे असा ट्रेंडही आलेला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चोपडी येथील होलार समाजाने गेल्या वर्षभरापासून या विधीवेळी नवा पांडा पाडला आहे व लोकांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशी चोपडी येथील स्मशानभूमीत त्या कुटुंबामार्फत वृक्षारोपण केले जाते. तसेच पुढे त्याचे पुण्यस्मरणाच्या रूपाने संवर्धन व संगोपन केले जाते. यातून प्रियजन व्यक्तीच्या आठवणी चिरंतर राहतात.तसेच पर्यावरणाच्या रक्षणाचं महान कार्यही होते.
हाच आदर्श व पायंडा पुढे चालू ठेवण्यासाठी समाजाने घालून दिलेली पर्यावरणपूरक कृती चोपडी येथील भजनावळे कुटुंबाने केली आहे.जनार्धन भजनावळे (गुरुजी) यांच्या पत्नी व समाधान जनार्धन भजनावळे यांची आई कै.सुभद्रा जनार्धन भजनावळे यांचे दिनांक २२/१२/२०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. आज चोपडी येथे रक्षाविसर्जनाचे कार्य संपन्न झाले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण करून समाजामध्ये पर्यावरण संगोपनाचा संदेश देण्याचं काम भजनावळे कुटुंबाने केले आहे.त्याचबरोबर चोपडी गावातील होलार समाजामध्ये हा पर्यावरण संगोपनाचा उपक्रम प्रत्येक कुटुंबाच्या वतीने राबविला जातो.रक्षाविसर्जन कार्यादिवशी एक झाड लावायचे व पूर्ण वर्ष त्या झाडाचे संगोपन करायचे असा उपक्रम राबविला जातो.यावेळी सर्व भजनावळे व केंगार कुटुंबीय व सर्व होलार समाज बांधव उपस्थित होते.