बाळेवाडीत आचारसंहितेचा भंग !

आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग करून विनापरवाना प्रचाराच्या शुभारंभ करून रॅली काढल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, १२ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास बाळेवाडी ता. आटपाडी येथील कोळेकर वस्ती येथील श्री धुळोबा मंदिरासमोर संजय भिकू कोळेकर, मारुती सुऱ्याबा यमगर, तुकाराम शंकर राजगे, जगन्नाथ बाबा कोळेकर, जगन्नाथ बापू कोळेकर, दिलीप संपत कोळेकर, रामचंद्र नामदेव कोळेकर, पोपट धोंडीराम खरात, सुरेश बापू खताळ, दत्तू विठोबा कचरे, विजय सत्यवान राजगे, उदयलिंग बापू खरात सर्व रा. बाळेवाडी व इतर ५० ते ६० अनोळखी लोकांनी ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने आटपाडी तहसीलदार यांनी फिर्यादी संभाजी जोतराम चरापले (वय २९ वर्षे, व्यवसाय- नोकरी) व त्यांच्यासोबतचे सहकारी निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचा भंग होणार नाही या अनुषंगाने पेट्रोलिंग करत श्री धुळोबा मंदिर कोळेकर वस्ती या मंदिरासमोर आले. यावेळी शासनाने दिलेल्या अटीचे पालन न करता ग्रामपंचायत निवडणूक आदर्श आचारसंहितेचा भंग करून विनापरवाना स्वामी सद्गुरु या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करून रॅली काढली. याबाबत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कोरवी करीत आहेत.