दिघंची-आटपाडी मार्गावरील अपघातात एक जागीच ठार

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

दिघंची-आटपाडी मार्गावर भवानीमळा येथे विठ्ठलापूर गावच्या हद्दीत आयशर टेम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आनंद उत्तम शिंदे या.हिंगणी ता.माण जि. सातारा असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून टेम्पो चालकाने घटनेनंतर पलायन केले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी-दिघंची मार्गावर विठलापूर गावच्या हद्दीत भवानीमळा येथे १३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान टाटा कंपनीचा आयशर टेम्पोने (एम. एच. १० झेड ३२०८) समोरून येणाऱ्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलला (क्र. एम एच १० यु ०६७१) समोरून जोराची धडक दिली. त्यामध्ये मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. घटनेची फिर्याद आरकेस उत्तम शिंदे (वय ३६, रा. हिंगणी, ता.माण जि. सातारा) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.