पतीचे अनैतिक संबंध व सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

पर महिलेशी अनैतिक संबंध व मुंबई येथील फ्लॅटचे पैसे भागवण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये अशी सतत पैशाची मागणी करून विवाहितेचा छळ केल्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दिघंची येथे घडली.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अक्षय प्रकाश सस्ते, सविता प्रकाश सस्ते, प्रकाश पांडुरंग सस्ते (सर्व रा. पडळेगाव, डोंबिवली पूर्व मुंबई, मुळगाव काळेवाडी ता.आटपाडी जि. सांगली) यांनी राहुल चंद्रकांत मोरे रा. डाकवालेमळा, दिघंची ता.आटपाडी जि. सांगली यांची बहीण रूपाली हिला मुंबई येथील फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये असे वारंवार म्हणून सततच्या पैशाच्या मागणीला तसेच शारीरिक, मानसिक त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे, अशा स्वरूपाची फिर्याद रूपालीचा भाऊ राहुल मोरे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. अक्षय याचे पर महिलेशी अनैतिक संबंध व पैशाच्या तगादा लावल्याने त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.नोव्हेंबर २०२० पासून ते १/११/२०२२ रोजी दुपारी १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान मुंबई येथे वेळोवेळी व दिघंची येथे राहुल मोरे यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.