संपत्तीच्या वादातून वडिलांना जीवे मारण्याची धमकी

प्रसिद्ध उद्योगपती प्रल्हाद घुटे यांची उंब्रज पोलिसात फिर्याद;नऊ जणांवर गुन्हा दाखल
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज
उंब्रज ता.कराड येथील प्रसिद्ध उद्योगपती प्रल्हाद घुटे यांना त्यांच्या राहत्या बंगल्यात मुलगा, सून, नातू व नातसून यांनी डांबून ठेवले. संपत्ती नावावर करून घेण्यासाठी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबर मारहाण केली,तसेच संपत्तीचे बेकायदेशीरपणे कुलमुखत्यारपत्र व बक्षीस पत्र करून घेतल्याची तक्रार प्रल्हाद गणपती घुटे( वय-८३) यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणी नितीन घुटे( मुलगा), सौ वंदना घुटे(सून), शुभम घुटे(नातू), टीना घुटे(नात सून) सर्व रा.उंब्रज यांच्यासह उत्तम आनंदा केंजळे(चरेगाव), कल्याण खामकर(कारंडवाडी), गणेश बबन पोटेकर(मुंढे), संदीप हणमंत पोतले(मुंढे), दिगंबर रघुनाथ माळी (मलकापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
उद्योगपती प्रल्हाद घुटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वकष्टार्जित नितीराज या बंगल्यात राहण्यास असून या ठिकाणी मुलगा नितीन हा वारंवार तुमची सर्व संपत्ती माझ्या नावावर करा असा तगादा लावत होता. स्वकष्टार्जित मिळकती हडपण्याच्या उद्देशाने तसेच सर्व मिळकती बक्षीस पत्राने द्याव्यात या हेतूने मुलगा,सून,नातू, नातसून यांनी संगनमताने आपणास पहिल्या मजल्यावरील खोलीत कोंडून ठेवत खोली बाहेर पडण्यास बंदी घातली. तसेच मुलगी,जावई व नातेवाईकांना भेटण्यास मज्जाव केला. नातेवाईक मला भेटण्यास आल्यानंतर पाळत ठेवली जात होती. तसेच आपल्यावर दबाव टाकून मानसिक खच्चीकरण करण्यासोबत उपाशीपोटी ठेवले जात होते.
१२ सप्टेंबर ते १९ऑक्टोबर या कालावधीत मुलगा,सून,नातू तसेच नात सून संपत्ती बक्षीस पत्र करून देण्यासाठी दमदाटी करत होते. याचवेळी मुलगा नितीन याने रिव्हॉल्व्हर घेऊन दमदाटी केलेचा दावा तक्रारीद्वारे करण्यात आला आहे. नितीन याने माझे समोर रिव्हॉल्व्हर ठेवून ठार मारण्याची धमकी देत मी जिथे सांगेन त्या ठिकाणी सही व अंगठा करायचा असा दबाव टाकून २२ सप्टेंबरला व ३ ऑक्टोबरला कराड येथील रजिस्टर नोंदणी ऑफिसमध्ये नेले. त्या ठिकाणी अन्य संशयितांनी आम्ही दस्त करतेवेळी साक्षीदार आहोत. मुलगा म्हणतोय तसे करून टाका नाहीतर तुम्हाला जड जाईल अशी दमदाटी केली. तसेच त्यावेळी इच्छेविरुद्ध मारहाण करून माझी मालमत्ता जबरदस्तीने घेण्यासाठी भाग पाडून कुलमुखत्यार पत्र हे मुलगा याने स्वतःच्या नावे व बक्षीसपत्र नातू शुभम घुटे याचे नावे बेकायदेशीर पद्धतीने करून घेतले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच दिनांक १२ सप्टेंबरला विश्वासाचा गैरफायदा घेऊन माझ्या परवानगीशिवाय माझ्या ऑफिसमध्ये येत उत्तम केंजळे,शुभम घुटे व ड्रायव्हर कल्याण खामकर यांनी माझ्या संपूर्ण प्रॉपर्टीचे ओरिजनल फाईल,आधार कार्ड,पॅन कार्ड,मतदान कार्ड,चेकबुक, पासपोर्ट साईझचे फोटो या वस्तू नेल्या असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आबा जगदाळे करीत आहेत.