जुनोनीनजीक भरधाव कारने वारकरी चिरडले!

७ ठार, ८ गंभीर जखमी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जुनोनी

जुनोनीनजीक वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये भरधाव वेगाने जाणारी कार पाठीमागून घुसून झालेल्या अपघातात सुमारे पंधरा वारकरी गंभीर जखमी झाले होते. त्यातील सात वारकरी ठार झाले असून आठजण मृत्यूची झुंज देत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.सांगोला-मिरज रस्त्यावर आज सायंकाळी ही हृदय द्रावक घटना घडली.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी निघाले होते. मिरज-पंढरपूर मार्गावर सांगोला तालुक्यातील जुनोनी गावानजिक पायी चालत आले असताना सायंकाळच्या सुमारास एक भरधाव कार वारकऱ्यांच्या या दिंडीत पाठीमागून घुसली. यामध्ये पंधरा वारकरी जखमी झाले होते. त्यातील सात जणांचा मृत्यू झाला असून आठजण मृत्यूशी झुंज देत आहेत.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यामध्ये एक पुरुष, पाच महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे. करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील हे वारकरी असून त्यांचे प्राण गमावल्याने करवीर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
टाटा टेक्सॉंन कारमधील दोघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगोला तालुक्यातील सोनंद येथील कारमधील व्यक्ती आहेत.
मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्याकडुन मदत जाहीर
मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आणि या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला, याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत,अशी माहिती समोर येत आहे.