प्रसार माध्यमांनी सहकार्य करावे- प्राचार्य डॉ.विजय लोंढेे

आटपाडी येथे उद्यापासून शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती युवा महोत्सव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथे उद्या रविवार दि. १६ ते मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर अखेर श्रीमंत बाबासाहेब देशमुख जन्मशताब्दी वर्षाचे औचित्याने शिवाजी विद्यापीठाचा ४२ वा मध्यवर्ती युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय लोंढे यांनी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.महाविद्यालयाने या सोहळ्याचे नेटके नियोजन केले असून यासाठी ३२ समित्या कार्यरत करण्यात आलेल्या आहेत. युवा महोत्सवांमध्ये ३२ विविध कला प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार असून सुमारे ३००० विद्यार्थी यामध्ये सहभाग घेणार आहेत. १३२ महाविद्यालयांमधून विद्यार्थी थेटपणे सहभाग घेणार आहेत. ४४ शास्त्रीय नृत्य प्रकार तसेच पंधरा इव्हेंटच्या माध्यमातून ८८७ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यासाठी एकूण दहा स्टेजची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त हा सोहळा विशेष पर्वणी असणार आहे. यासाठी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य विजय लोंढे यांनी केले.प्रा.विजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तसेच आभार मानले.यावेळी महाविद्यालयाचे प्रसिद्धीप्रमुख प्रा.दादासाहेब काळे,प्रा.संजय हजारे, कार्यालयीन अधीक्षक अधिक्षक माळी, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.जाधव, कार्यालयीन कर्मचारी जावीर, यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
आटपाडी तालुक्यासह माणदेश ही प्रगल्भ सांस्कृतिक वारसा असलेली भूमी असून आहे. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी या भागातील गोरगरीब, कष्टकरी लोकांच्या शैक्षणिक विकासासाठी शाळा महाविद्यालय स्थापन करून मोठी चळवळ उभी केली आहे.त्यातून अनेक रत्ने तयार झाली आहेत. आपल्या भागातील अनेक पारंपारिक खेळ वाद्य व इतर कलाप्रकार एकमेव द्वितीय आहेत.युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन सर्व क्षेत्रात या भागातील विद्यार्थ्यांनी अलौकिक यश प्राप्त करावे, यासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. आटपाडी तालुक्यासह मानदेशाने या संधीचा सदुपयोग करून घ्यावा असे आवाहनही यावेळी संयोजकांच्या वतीने करण्यात आले.

रविवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता उद्घाटन समारंभ असून दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंहबापू देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ.आर.व्ही. गुरव कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. तहसीलदार बी.एस.माने, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे उपस्थित राहणार आहेत. मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता समारोपाचा कार्यक्रम असून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. डी.टी.शिर्के कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. संस्थेचे चेअरमन अमरसिंहबापू देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.
दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष कारंडे, सचिव एच.यु.पवार, निरीक्षक अशोक चौगुले यांची प्रमुख उपस्थिती आहे.
रविवारी पहिल्या दिवशी नोंदणी, उद्घाटन, भारतीय समूहगीत, मूकनाट्य, नकला, लोककला, लघुनाथिका, एकपात्री अभिनय, सुगम गायन, शास्त्रीय गायन, पथनाट्य, मराठी, हिंदी,इंग्रजी, वक्तृत्व, वादविवाद, व्यंगचित्र, कातरकाम, मेहंदी, रांगोळी, प्रश्नमंजुषा, शास्त्रीय नृत्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी दि.१७ ऑक्टोबर रोजी पाश्चिमात्य समूहगीत, पाश्चिमात्य एकल वाद्यवादन, लोकसंगीत वाद्य वादन, लोकनृत्य, एकांकिका,, शास्त्रीय नृत्य, पाश्चिमात्य एकल गायन, शास्त्रीय सूरवाद्य, शास्त्रीय तालवाद्य,स्थळ छायाचित्र, स्थळ चित्र, सांघिक रचनाकृती, भितीचित्र, निर्मिती, मातीकाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तिसऱ्या दिवशी माजी विद्यार्थ्यांचे संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय लोंढे, मध्यवर्ती युवा महोत्सव समितीचे सचिव डॉ. दत्तात्रय जाधव, सदस्य डॉ. शिवाजी विभुते, प्रा.संजय हजारे, डॉ. सौ. ऋतुजा कुलकर्णी, डॉ. अमोल मोरे यांनी केले आहे. श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी येथे या कार्यक्रमासाठी विविध रंगमंचाचे व्यवस्थापन केले आहे. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग या कार्यक्रमाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज आहे.