व्यसनाधीन तरुणाच्या अंध:कारमय जीवनात पोलीस निरीक्षकांनी दाखविली प्रकाशाची वाट

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
रायगड

एका तरुणाने आपल्या आयुष्यात व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन सर्वस्व हरवून बसला होता, बाहेरच्यासह कुटुंबातील सदस्यदेखील त्याच्या उपद्रवामुळे अक्षरशः हैराण झाले होते. व्यसनात पूर्णपणे अडकलेला हा तरुण पुन्हा यातून बाहेर पडेल की नाही याची शाश्वती नव्हती. मात्र या तरुणाच्या आयुक्ष्यात एक पोलीस निरीक्षक आला, आणि या पोलीस निरीक्षकामुळे व्यसनाच्या खोल गर्तेत गेलेला हा तरुण व्यसनातून बाहेर आला.एवढेच नाही तर त्याच्या वागण्या, बोलण्यातही कमालीची सुधारणा झाली असून आता हा तरुण आदर्श जीवनप्रणाली जगत आहे.
हे पोलीस निरीक्षक आहेत माणगाव पोलीस स्थानकातील राजेंद्र पाटील. तर व्यसनातून बाहेर पडलेला तरुण अब्रार. व्यसनाधीनतेत बुडालेल्या तरुणात परिवर्तन झालेय. माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी ही किमया केलीय. व्यसनाधीन तरुणासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील मसीहा बनलेत.
व्यसन माणसाला उध्वस्त करते, मात्र अब्रारच्या अंगी असलेल्या गुणांची कौशल्याची त्यांनी पारख केली व त्याच्या अंधारमय जीवनात प्रकाशाची पहाट आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याला समजावून व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले. त्याला संपुर्णपणे आधार देत मार्गदर्शन केले.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. अब्रार आता आपल्या कुटुंबात प्रतिष्ठा व सन्मानाने जगतोय.
व्यसनात बुडालेल्या तरूणांना व्यसनाचे तोटे सांगून त्यांनादेखील व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करतोय. अब्रारच्या वडिल व कुटुंबियांनी आपल्या मुलातील झालेला सकारात्मक बदल पाहून पीआय राजेंद्र पाटील यांचे आभार मानलेत.
राजेंद्र पाटील हे माणगाव पोलीस स्थानकात रुजू झाल्यापासून गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्यापासून समाजात जनजागृती, व्यसनमुक्ती व प्रबोधन व आदीवासी वाड्यापाड्यात लोकशिक्षणाची चळवळ गतिमान करण्याचे काम हाती घेतलंय. समाजात सकारात्मक ऊर्जा व परिवर्तन घडवून आणण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करतायेत.
पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करीत असलेल्या प्रेरक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होतेय.