शेतकरी संघटनेचे निमगाव पाटी येथे आज ११ वाजता चक्काजाम आंदोलन

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समिती अंतर्गत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला सन २०२२-२३ च्या गाळप हंगामधील उसाला पहिली उचल २५०० रुपये व अंतिम दर ३१०० रुपये मिळावा ,सर्व कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन व्हावे व ओव्हरलोड ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओ मार्फत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर निमगाव पाटी येथे गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनपत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी जिल्हाधिकारी सोलापूर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज, तहसीलदार माळशिरस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकलूज, पोलीस निरीक्षक अकलूज यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे की, जर राजकीय मतभेद विसरून सर्व नेतेमंडळी एकत्र येऊन ऊस दर पाडत असतील तर आम्ही आमच्या घामाच्या पैशाचा दाम मिळवण्यासाठी सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन ऊस दर संघर्ष समितीची स्थापना केली आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरू असाही इशारा यामध्ये देण्यात आलेला आहे.
गेल्या काही दिवसापासून निमगाव पाटी हे ऊस दर आंदोलनाचे एक केंद्र बनले असून या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुक्याचे कार्यालय असून संपूर्ण घडामोडी याच ठिकाणाहून होत असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांच्या एकीदेखील याच ठिकाणाहून झाली आहे. यामुळे मूळ केंद्र असलेल्या निमगाव पाटी येथील चक्काजाम आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी केले आहे.या पत्रावर अजित बोरकर, साहिल आतार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मगन काळे यांच्या सह्या आहेत .