
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ
नेहरू युवा केंद्रातर्फे स्वातंत्र्यसंग्रामातील देशभक्तीची भावना व मूल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृद्धिंगत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी १० ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
युवा उत्सवात चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धा, कविता लेखन कार्यशाळा आणि स्पर्धा, छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धा, जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जिल्हा युवा संमेलन भारत 2047 युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धक सांगली जिल्ह्यातील रहिवासी असावा. एक एप्रिल रोजी त्याचे वय 15 ते 29 वर्षे पर्यंत असावे. एका व्यक्तीला एका स्पर्धेत सहभागी होता येईल. तसेच विजेत्यांना रोख बक्षीस स्मृतीचिन्ह व स्पर्धेतील सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
चित्रकला कविता लेखन छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धेसाठी प्रत्येकी 30 युवकांना सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस एक हजार रुपये, द्वितीय 750 रुपये, तृतीय पाचशे रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेसाठी दहा युवकांना सहभागी होता येईल.यासाठी प्रथम बक्षीस पाच हजार रुपये, द्वितीय दोन हजार रुपये, तृतीय 1000 रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमात दहा समूह संच सहभागी होऊ शकतील. एका समूह नृत्यात किमान पाच तर कमाल 20 स्पर्धक सहभागी होऊ शकतील.यासाठी प्रथम बक्षीस पाच हजार रुपये, द्वितीय 2500 रुपये, तृतीय 1250 रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय युवा संमेलन भारत 2047 युवा संवाद मध्ये शंभर युवक सहभागी होऊ शकतील. या सहभागीय युवकांमधून विषयाची मांडणी, वक्तृत्व शैली या आधारावर चार युवकांची परीक्षांकामार्फत निवड करून प्रत्येकी एक हजार पाचशे रुपये बक्षीस देण्यात येईल.
सदर कार्यक्रम ऑक्टोबर 2022 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी युवकांनी 10 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावे तसेच अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र, दुसरा मजला, भारती विद्यापीठ भवन येथे संपर्क साधावा असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे कवठेमहांकाळ तालुका प्रतिनिधी विशाल पाटील व शुभम कानडे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद