वाळूतस्करी करणारा ट्रॅक्टर पथकाने पकडला!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील जाधव मळ्याजवळ पुलाच्या उजवीकडे देशमुखवाडी हद्दीत माणगंगा नदीच्या पात्रात अवैधपणे वाळूने भरलेला ट्रॅक्टर पेट्रोलिंग करणाऱ्या पथकाने पकडला.तहसील कार्यालयाकडे ट्रॅक्टर घेऊन येत असताना कोतवालास ट्रॅक्टरमधून ढकलून देऊन बोंबेवाडीच्या दिशेने पलायन केले. याबाबतची फिर्याद प्रमोद तात्यासो पुजारी (रा. पुजारवाडी आटपाडी जि. सांगली) याच्याविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिघंचीचे मंडल अधिकारी अरुण बन्सी साळुंखे व त्यांच्यासोबत तलाठी एस.के.कुंभार, कोतवाल डी.बी. मुलाणी, कोतवाल पोपटी वाघमारे हे अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबाबत मोटरसायकलवरून पेट्रोलिंग करीत होते. दि.२३ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पिंपरी खुर्द येथील जाधव मळ्याजवळ पुलाच्या उजवीकडील बाजूस देशमुखवाडी हद्दीच्या माण नदीच्या पात्रात ते गेले असता त्यांना लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा 575 डी आय ट्रॅक्टर व पाठीमागे पिवळ्या रंगाच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू भरलेली दिसून आली. ट्रॅक्टरसोबत असलेला असलेला प्रमोद तात्यासो पुजारी (रा.पुजारवाडी,आटपाडी) याचा वाळूने भरलेला ट्रॅक्टर तहसीलदार ऑफिस आटपाडी येथे घेऊन येत असताना सोनारसिद्ध मंदिराच्या डाव्या बाजूच्या ओढ्यात ट्रॅक्टर घालून कोतवाल पोपट वाघमारे यांना ट्रॅक्टरमधून ढकलून देऊन वेगाने बोंबेवाडी गावच्या दिशेने निघून गेला.
याबाबतची फिर्याद मंडल अधिकारी अरुण साळुंखे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली असून पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक चोरमले पुढील तपास करीत आहेत.