महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र,बोरमाळ चोरट्याने केली लंपास

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

शेतातील मजुरीचे काम करून डोक्यावर मक्याची पेंडी घेऊन घरी चाललेल्या मासाळवाडी येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेला गवरचिंचमळा येथे मोटरसायकलवरून आलेल्या एका अज्ञात इसमाने गळ्यामध्ये हात घालून सोन्याचे मंगळसूत्र व बोरमाळ घेऊन पळून गेल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सौ.कमल जगन्नाथ सरगर (रा.मासाळवाडी ता. आटपाडी जि. सांगली) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सौ.कमल सरगर या मजुरीने शेतातील काम करून डोक्यावर मक्याची पेंडी घेऊन मासाळवाडी येथे पायी चालत घरी निघाल्या होत्या. गवरचिंचमळा येथील संभाजी पाटील यांच्या घरासमोर त्या आल्या असताना एक अज्ञात इसम एका मोटरसायकलवरून त्यांच्याजवळ येऊन आजी असा आवाज दिला. तेव्हा त्या थांबल्या असता त्याने त्यांच्या गळ्यामध्ये हात घालून गळ्यातील सुमारे २१ हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे दोन गोल वाट्या, सोन्याचे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र व सुमारे १८ हजार रुपये किमतीची सहा ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ असे ३९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून मोटरसायकलवरून मासाळवाडी गावच्या दिशेने पळून गेला. या घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.