
चरेगाव परिसरातील शेतकरी चिंतेत, लसीकरणाची मागणी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज
चरेगाव ता.कराड परिसरातील खालकरवाडी,कळंत्रेवाडी तसेच उंब्रज परिसरात सतत वावर असणाऱ्या भटक्या वळूमध्ये लंपी सदृश्य लक्षणे आढळल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्वरित लसीकरण मोहीम हाती घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
गेले काही दिवसांपासून राज्यात लंपी स्कीनचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. सातारा जिल्ह्यात चार तालुक्यांमधील जनावरांना लंपी स्कीनची बाधा झाली आहे. लंपी त्वचारोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. एकीकडे शासनाने जनावरांना आवश्यकतेनुसार लसीकरणासाठी लस व उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध केला आहे. तसेच लंपी संशयित पशुधन आढळल्यास तातडीने त्या ठिकाणी पोहोचून उपचार करावेत व शेतकऱ्यांचे पशुधन वाचवावे त्याचबरोबर आजूबाजूच्या जवळपास पाच किलोमीटर अंतराच्या परिघामध्ये लसीकरण मोहीम राबवण्याचे शासन आदेश आहेत. तसेच या कामात कोणीही कुचराई अथवा हलगर्जीपणा करू नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ.डी.बी.बोर्डे यांनी दिला आहे.
दरम्यान, दुसरीकडे मात्र चरेगाव ते उंब्रज दरम्यानच्या परिसरात वावरणाऱ्या या भटक्या वळूमध्ये बुधवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी लंपी सदृश्य लक्षणे दिसून आली होती. सदर वळूच्या अंगावरती जागोजागी गाठी आल्या आहेत. ह्या घटनेला आज जवळपास तीन दिवस उलटून गेले असून सुद्धा येथील पशुसंवर्धन विभागाने परिसरामध्ये अद्यापही लसीकरण मोहीम राबवली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे शासन नियमाचे उल्लंघन होण्याबरोबरच परिसरात लंपी स्किन प्रादुर्भावाचा धोका अधिक गडद झाला आहे.
“लंपी संशयित भटक्या वळूवरती योग्य ते उपचार सुरू आहेत. परिसरातील पशुधनाला लसीकरणासाठी लस उपलब्ध करण्यासंदर्भात वरिष्ठांना कळवले असून लवकरच लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे.”-डॉ विजय भोसले,पशुधन विकास अधिकारी- पशुवैद्यकीय दवाखाना उंब्रज

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर