साधूंना मारहाण प्रकरणातील सात जणांची जामीनावर मुक्तता

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

जत तालुक्यातील लवंगा येथे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील साधूंना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे प्रकरण राज्यभर चांगलेच पसरले आहे. बुधवारी दिवसभर घटनास्थळी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम हे तळ ठोकून होते. पोलिसांनी २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील सात जणांना अटक केले होते. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने जामीनवर मुक्तता केली आहे.
देवदर्शनासाठी निघालेल्या साधूनी लवंगा येथे पंढरपूर तीर्थक्षेत्राला रस्ता विचारला होता. मात्र गावातील सरपंच पुत्रासह जमावाने मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून चारही साधूना अमानुषपणे मारहाण केली होती. मात्र साधूंनी याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दिली नव्हती. दरम्यानच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पोलीस यंत्रणा सतर्क झाली. तब्बल २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते .गुरुवारी जत येथील न्यायालयासमोर सात संशयित आरोपींना उभे केले असता न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली आहे.