पाली नगरपंचायत कार्यालयासमोर भरधाव डंपरने तीन गुरांना चिरडले

चालक व डंपर पोलिसांच्या ताब्यात
अवजड व ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पाली/
बरेचसे
पालीतील अवजड वाहने व डंपर वाहतुकीचा धोका सातत्याने जाणवत होता.नागरिकांनी संभाव्य अपघाताची शक्यता व्यक्त करून सदर धोकादायक वाहतुकीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी देखील सातत्याने लावून धरली जात होती, मात्र या वाहतुकीवर कोणतीही उपाययोजना न झाल्याने मुक्या जनावरांना हकनाक जीव गमवावा लागला आहे. पाली नगरपंचायत कार्यालयासमोर एका भरधाव डंपरने सोमवारी (ता.12) पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास 3 गुरांना चिरडल्याची घटना घडली आहे. यावेळी स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे लागलीच काही डंपर थांबविण्यात आले. पोलिसांनी काही संशयित डंपर चालक व डंपर ताब्यात घेतले आहेत. स्थानिकांनी या अपघातसंदर्भात पाली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पुढील प्रकरणाचा सखोल तपास पाली पोलीस करत आहेत.
मागील अनेक दिवसांपासून पालीतून होत असलेल्या अवजड व ओव्हरलोड वाहतुकी बाबत जनमानसांत संताप होता, वेगवान डंपर कधी कुणाचा जीव घेतील अशी चर्चा नेहमी व्हायची, अनेकदा या अरुंद रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या मोटारसायकल स्वार, लहान मुले, पादचारी यांना देखील धोका जाणवत होता. यावर उपाययोजना करावी अशी मागणी पालिकर जनता प्रशासनाकडे करीत होती, मात्र कोणतीही उपाययोजना करण्यात येत नव्हती, अखेर मुक्या जनावरांना चिरडले आणि अवजड व वेगवान वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.
दरम्यान गुरांना डंपरने चिरडल्यानंतर मोकाट गुरांचा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय, ज्या मालकांची ही गुरे आहेत , ती त्यांच्याकडून गोठ्यात बांधली का जात नाहीत, अनेकदा गुरे चोरीच्या देखील घटना घडतात, मोकाट गुरांना मालकांनी आपल्या निगराणी खाली देखील ठेवले पाहिजे जेणें करून ते सुरक्षित राहतील.