खुनाच्या घटनेने नागोठणे हादरले,पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
रायगड
ऑनलाइन जुगार व लोकांचे कर्ज फेडीसाठी पैशांची गरज असलेल्या २३ वर्षीय तरुणाने आपल्या १८ वर्षीय मित्राचा बळी घेतल्याची खळबळजनक घटना नागोठण्यात घडली आहे. गळ्यातील सोन्याची चैन न दिल्याने ती मिळविण्यासाठी नागोठण्यातील आंगरआळी येथील प्रितेश केदारी याने कुंभार आळीतील त्याचा जिवलग मित्र साहिल संजय कडू याच्या मानेला दोरीने आवळून खून केला. या घटनेने संपूर्ण नागोठणे शहर हादरून गेले असून काही वर्षांपूर्वी रोठ ( रोहा ) येथील तरुणाचाही त्याच्या मित्रांनी अशाचप्रकारे खून केल्याने या घटनेची पुनरावृत्ती नागोठण्यात झालीय.
साहिल कडू हा मित्रासोबत बाहेर जातोय असे आई – वडिलांना सांगून घरातून निघून गेला होता. खूप वेळ होऊनही तो घरी न परतल्याने तसेच आजुबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेऊनही तो न सापडल्याने ३० ऑगस्टला नागोठणे पोलीस ठाण्यात त्याचे वडील संजय कडू यांनी मुलगा हरविल्याची तक्रार दाखल केली होती . नागोठणे पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी आपल्या अनुभवाचा कस लावत मृत साहिल याच्या मोबाईल कॉलच्या तपशीलाच्या आधारे जलदगतीने तपास करून सर्व संशयितांना ताब्यात घेतले . यातील मुख्य संशयित प्रितेश केदारी याची कसून चौकशी करताना त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याच्याकडून या खूनाच उलगडा झाला . आरोपी प्रितेशकडूनच मिळालेल्या माहितीनुसार वासगाव रस्त्यालगतच्या जंगलात मारून टाकलेला साहिलचा मृतदेह पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला.
नागोठण्यातील कोएसो अग्रवाल हायस्कूलच्या पुढे व वासगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला पायवाटेने जाणाऱ्या जंगलभागात २९ ऑगस्टलाच दुपारी ३ च्या सुमारास हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले . प्रितेशला पैशाची गरज असल्याने त्याने साहिलच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला . मात्र साहिलने त्यास विरोध केल्याने झालेल्या झटापटीत आरोपी प्रितेश याने त्याच्या जवळ असलेल्या दोरीने साहिलचा गळा आवळून त्यास जीवे ठार मारले . साहिलची सोन्याची चैन विकण्यासाठी गेलेल्या प्रितेश यांच्या सोबत अजून २-३ जण असल्याची माहिती उपलब्ध झाल्याने या खून प्रकरणात आणखी काहीजण असल्याचा संशय मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी या घटनेशी संबधित सर्व सह आरोपींचा शोध घेऊन संबंधित सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत साहिलच्या नातेवाइकांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे व रोहाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी नागोठणे पोलीस ठाण्यास भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. याप्रकणी आरोपी प्रितेशला अटक करून त्याच्यावर नागोठणे पोलीस ठाण्यात खून व जबरदस्तीने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या