आटपाडी पोलिसांची कारवाई,पाच दिवसांची पोलीस कोठडी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील चाळीस लाख रुपयांच्या घरफोडीच्या दरोड्यातील फरार आरोपी प्रथमेश मुकुंद शिंदे (वय २०,रा.लेंगरे या.विटा) यांच्यासह आटपाडी तालुक्यातील दोन जबरी चोरीतील चोरट्यांना आटपाडी पोलिसांनी आज दुपारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. १४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ४० ग्रॅम वजनाची चैन, दोन मोटारसायकली असा एकूण सुमारे ३ लाख,५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत विटा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम व आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिलेली माहिती अशी की, दिघंची एसटी स्टँड येथे दोन संशयित व्यक्ती एका विनानंबर प्लेटच्या मोटरसायकलवरून संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना खास बातमीदारामार्फत मिळाली. त्यांना ताब्यात घेण्याचा सूचना दिल्यानंतर पोलीस स्टाफने तात्काळ दिघंची येथून त्या संशयितांना मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्यांच्याकडे नाव-गाव याबाबत विचारणा केली असता त्यांनी स्वप्निल दगडू खिलारे (वय २०) व प्रथमेश मुकुंद शिंदे (वय १९, दोघेही रा. लेंगरे ता. खानापूर जि. सांगली) असे सांगितले. त्यांच्याकडे सुरुवातीला या ठिकाणी का आला याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजणेच्या सुमारास दिघंची ते खवासपूर जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याने चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून चोरून मोटरसायकलवरून पळून गेल्याबाबतची कबुली त्यांनी दिली. याबाबतचा गुन्हा आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल होता. वैशाली पांडुरंग यादव रा.खवासपूर ता.सांगोला जि.सोलापूर यांनी याबाबत या गुन्ह्याची फिर्याद दिलेली होती.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी २० मार्च रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घरनिकी गावाच्या हद्दीत ओढ्याकडेला मोटरसायकलवरून एक ७० वर्षाचा वृद्ध जात असताना त्यांना थांबवून त्याच्या गाडीची चावी काढून घेऊन त्याच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची चैन हिसडा मारून जबरदस्तीने तोडून घेऊन मोटरसायकलवरुन पळून गेले. याबाबतची फिर्याद दाखल होती. ही फिर्याद रामचंद्र सुखदेव पवार रा.घरनिकी, ता.आटपाडी यांनी दिली होती.
यातील आरोपी प्रथमेश मुकुंद शिंदे याच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून तो परागंदा आरोपी आहे.
या दोन्ही गुन्ह्यातील चोरीस गेलेले १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व ४० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तसेच आरोपींनी गुन्हा करताना वापरलेल्या दोन मोटरसायकली असा एकूण तीन लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे.
यातील प्रथमेश मुकुंद शिंदे हा ४० लाख रुपये दरोडा टाकलेल्या टोळीतील फरारी आरोपी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये या दरोड्याबाबत गुन्हा नोंद आहे. ५ जून २०२२ दरम्यान ही घटना घडली होती.यातील तीन आरोपी तुरुंगात असून प्रथमेश हा चौथा आरोपी आहे. अन्य एक आरोपी फरार आहे.
पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस हवालदार कोरवी, पाटील, पोलीस नाईक अमोल कराळे, नितीन मोरे,संभाजी सोनवणे, ढाले, लोंढे यांनी ही कारवाई केली.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या