दिघंची येथील पेट्रोल पंपावर पहाटे दरोडा!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे पंढरपूर-मल्हारपेठ रस्त्यावर असलेल्या एचपी पेट्रोल पंपावर तीन अज्ञात इसमांनी पहाटे पेट्रोल भरण्याचा बहाना करून धारदार हत्याराचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील सेल्समनला लुटले. तसेच कपाट फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तिघा अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिघंची येथे पंढरपूर ते मल्हारपेठ रस्त्यालगत एचपी कंपनीचा पेट्रोलपंप आहे.रविवारी पहाटे दोन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास तीन अज्ञात आरोपींपैकी एकाने डोक्यास हेल्मेट घालून मोटरसायकलवरून येवून मोटर सायकलमध्ये पेट्रोल भरण्याचा बहाणा केला. यावेळी आदित्य सदाशिव रणदिवे (वय ३० वर्षे, रा. दिघंची ता. आटपाडी) हा सेल्समन पेट्रोल चालू करण्यास जात असताना कपड्याने तोंड लपवून कोयत्यासारखे धारदार हत्यार हातात घेऊन इतर दोन आरोपींनी पेट्रोल पंपाच्या मागील कंपाऊंडवरून येऊन सेल्समन व त्याचा सहकारी यांना धाक दाखवला, त्यावेळी त्यांच्यामध्ये झटापटी झाली. पेट्रोल पंपावरील या दोघांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करून सेल्समनच्या खिशात ठेवलेले ९ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन हेल्मेट घातलेल्या आरोपीने येऊन अजून पैसे कोठे ठेवले आहेत, सांगा नाहीतर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच ऑफिसमधील कपाट तोडण्याचा प्रयत्न करून तिथून ते तिघेही अनोळखी इसम निघून गेले. याबाबतची फिर्याद सेल्समन आदित्य रणदिवे याने आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली असून अप्पर पोलीस अधीक्षक तसेच आटपाडीचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत.