अलिबाग येथील प्रवचनकारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उरण

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वर्तक आळी, चौल येथे राहणारे व धार्मिक अध्यात्मिक प्रवचन करणारे प्रमोद दिनानाथ केणे यांच्यावर रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस ठाण्यात पिडित महिलेच्या तक्रारीवरून बलात्कार, लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूकीबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेवदंडा पोलिस ठाण्यात प्रमोद दिनानाथ केणे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत महिलेने तक्रार दिली असून नोंदविलेल्या माहितीनुसार प्रमोद दिनानाथ केणे यांनी फसवणूक करून सदर महिलेला मी दत्तभक्त आहे.दत्तांनी मला साक्षात्कार दिला आहे. दत्तांनी मला तुला मदत करण्यासाठी पाठविले आहे. तूला मी कंपनीत काम देतो, असे सांगून दत्ताचे शिष्य म्हणून प्रसिद्ध असलेले व धार्मिक अध्यात्मिक प्रवचन देणारे प्रमोद दिनानाथ केणे यांनी सदर महिलेची फसवणूक करून गाणगापूर येथून नेले.त्यांनंतर भाईंदर येथील एका खोलीत सदर महिलेला डांबून ठेवले व जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. लैंगिक अत्याचारामुळे सदर महिलेला दिवस गेले. मात्र प्रमोद दिनानाथ केणे यांनी या महिलेला औषध पाजवून जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला . त्यानंतर सदर पीडित महिलेला अलिबाग येथे एका रूममध्ये 3 वर्षे बंदिस्त ठेवण्यात आले.यावेळी सदर महिलेवर सतत 3 वर्षे प्रमोद केणी यांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. शारिरीक व मानसिक त्रास दिला, 9 वर्षे कामावर ठेवून घेऊन घरकामाला लावले, विविध कामे सांगितली.चार हजार रुपये महिना पगार देतो असे सांगितले.९ वर्षाचे महिन्याला चार हजार रूपयेप्रमाणे एकूण ४ लाख,३२ हजार इतका पगार झाला. परंतू एक रुपयाही प्रमोद केणे यांनी महिलेला दिलेला नाही. तिची आर्थिक फसवणूकसुध्दा झाली.त्यानंतर प्रमोद केणे यांनी शारीरिक, मानसिक,आर्थिक शोषण केल्यानंतर तिचा उपयोग केल्यानंतर सदर महिला आजारी पडली. तिचा काहीच उपयोग नसल्याने सदर महिलेला गुजरातमधील गरुडेश्वर येथे दुसऱ्यांमार्फत नेऊन सोडले.झालेला अन्याय सहन न झाल्याने पीडित महिला गरुडेश्वर येथे असलेल्या एका नदीत आत्महत्या करायला गेली. एका साधूने तिचे प्राण वाचविले. त्या साधुला तिने सर्व हकीगत सांगितली.महिलेच्या अंगावर असलेल्या जखमा बघून त्या साधूने तिला योग्य ठिकाणी नेऊन तिच्यावर उपचार केले. झालेल्या जखमांवर उपचार घेऊन सदर महिला बरी झाली. पूर्ण बरी झाल्यास सदर महिलेने रेवदंडा पोलिस स्टेशन गाठत प्रमोद दीनानाथ केणे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.१२ तोळे सोने, साडेतीन लाख रुपये घेउन, पगाराची सुमारे ४ लाख,३२ हजार रूपये न देता व अज्ञानाचा फायदा घेत १९९६ ते २०१४ या काळात प्रमोद दीनानाथ केणे यांनी इच्छेविरुद्ध वेळोवेळी लैंगिक शोषण करून गर्भपात घडवून आणला. अशी तक्रार सदर महिलेने रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस ठाण्यात नोंदविली आहे.
रेवदंडा पोलिस ठाण्यात प्रमोद दीनानाथ केणे याच्या विरोधात दिनांक २०/०८/२०२२ रोजी बलात्कार,मारहाण, धमकी अशा गंभीर गुन्हयांची तक्रार दाखल झाली असून सदर प्रकरणी अलिबाग न्यायालयाने दिनांक २९/०८/२०२२ रोजी अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे.सदर प्रकरणातील प्रमोद दीनानाथ केणे फरार असून त्याने आपला फोन बंद ठेवला आहे. सदर इसम स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणव‌तो व धार्मिक विषयावर प्रवचन देत सर्वत्र फिरत असतो. अलिबाग येथील आंबेपूर येथे शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या नावाने विविध प्रकारचे पूजा अर्चा करवितो व महिलांना विविध आमिषे दाखवून आपल्या जाळ्यात ओढतो.व नंतर त्यानंतर त्या महिलांचे शारिरिक, मानसिक शोषण करतो, त्यांची आर्थिक फसवणूक सुद्धा करतो असे पिडित महिलेने आपल्या तक्रारीत सांगीतले आहे. एवढे मोठे प्रकरण होऊन सुद्धा, गंभीर गुन्हा दाखल होऊनसुद्धा प्रमोद दीनानाथ केणी याचा अजून तपास लागला नाही.याबद्दल जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रमोद दीनानाथ केणे नेमका कुठे आहे याचा तपास रेवदंडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी करीत आहेत.