सासरच्या जाचाला कंटाळून खरसुंडीत विवाहितेची आत्महत्या

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

‘लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी ५० हजार रुपये घेऊन ये’ असे म्हणून वारंवार दिलेल्या त्रासाला कंटाळून आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद विवाहितेच्या वडिलांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आकाश आनंदा शिंदे, मंगल आनंदा शिंदे, ज्योती प्रदिप इंगवले (तिघेही रा.खरसुंडी ता.आटपाडी जि.सांगली, सध्या रा. मुंबई) यांनी रामचंद्र अग्नू इंगवले (वय ४५, रा.डवरी गल्ली, खरसुंडी) यांची मुलगी यशोदा आकाश शिंदे (वय २४ वर्षे) हिला वारंवार लग्नाचे खर्च फेडण्यासाठी पन्नास हजार रुपये घेऊन ये असे म्हणून जाचहाट करून, लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळी व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून यशोदाने सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबतची फिर्याद रामचंद्र इंगवले यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील पुढील तपास करीत आहेत.