लागला मुलाचा ध्यास, लावला पत्नीच्याच गळ्याला फास!

आटपाडी पोलिसांनी मुंबईत मोठ्या सिताफीने आवळल्या आरोपींच्या मुसक्या!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

मुलगा होत नाही म्हणून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न
करणाऱ्या पतीसह त्याच्या साथीदाराच्या आटपाडी पोलिसांनी मोठ्या सिताफीने मुसक्या आवळल्या. काळेवाडी गावच्या हद्दीत चिंचघाट येथे आणून दोरीने गळा आवळून चिंचघाट डोंगरांमध्ये फेकून दिलेल्या महिलेला मॉर्निंग वॉककरिता आलेल्या ताडाचीवाडी येथील एका व्यक्तीच्या प्रसंगावधानाने जखमी अवस्थेत असलेल्या महिलेची माहिती पोलिसाला देऊन पोलिसांनी तातडीने उपचारासाठी सांगली येथे हलवून तिला जीवदान दिले.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रद्युमनकुमार पिताबास जेना (रा.साईबाबा मंदिरजवळ,००८, पाटीलवाडी, आगरवाडी मानखुर्द मुंबई ) व त्याची पत्नी या उभयतांना यापूर्वी दोन मुली आहेत. त्याची पत्नी सध्या गरोदर आहे.त्यांना मुलगा होत नाही, या कारणावरून पती व त्याचा साथीदार संपतराव एकनाथ गायकवाड (रा.मानखुर्द मुंबई, मुळगाव – पात्रेवाडी ता.आटपाडी जि.सांगली) याच्या मदतीने तिच्या पोटामधील मूल चेक करण्याचे आहे,असे सांगून तिला चार चाकी वाहनांमध्ये घेऊन काळेवाडी गावच्या हद्दीत चिंचघाट येथे घेऊन आले. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून तिला जीवे, ठार मारण्याच्या उद्देशाने तिचा दोरीने गळा आवळून चिंचघाट डोंगरांमध्ये फेकून दिले व ते तेथून निघून गेले होते. ही घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती.
दरम्यान मॉर्निंग वॉक करिता त्या परिसरात आलेले ताडाचीवाडी येथील सोमनाथ मच्छिंद्र इंगळे यांनी ही महिला जखमी अवस्थेत असल्याचे पाहिले व ११२ या क्रमांकावर कॉल करून माहिती दिली. त्यावरून पोलीस नाईक नितीन लोखंडे व पोलीस हवालदार तुकाराम ढाले घटनास्थळी तात्काळ जाऊन महिला पोलीस सुजाता जगदाळे यांच्यासह सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे उपचारकरीता दाखल केले. जखमी महिला शुद्धीवर आल्यानंतर तिने या घटनेबाबतची माहिती दिली. फिर्यादीवरून महिलेचा पती व त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यामधील आरोपींचे मोबाईल क्रमांकावरून तांत्रिक माहिती प्राप्त करून त्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई येथे तपास पथके रवाना करण्यात आली होती.आरोपींची माहिती काढून त्यांना तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
३० ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास काळेवाडी गावच्या हद्दीत चिंचघाट येथील डोंगरांमध्ये ही घटना घडली असून याबाबत ३१ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने तपास करून दोन्हीही संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी पोलीस हवालदार राकेश पाटील, उमर फकीर, पोलीस नाईक दिग्विजय कराळे, नितीन मोरे, प्रमोद रोडे,संभाजी सोनवणे, तसेच सायबर शाखेकडील पोलीस नाईक प्रकाश पाटील, पोलीस हवालदार कॅप्टन साहेब गुंडवाडे यांनी केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी करीत आहेत.