सरकारी डॉक्टर अडकला अँटीकरप्शनच्या जाळ्यात!

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

बिळूर (ता.जत) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत असलेल्या उपचारासाठी हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यास रंगेहात पकडले. डॉ. प्रमोद मारुती कांबळे ( वय ४६, रा. शिवाजी पेठ, जत) असे लाच घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
याबाबत माहिती अशी, बिळूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कांबळे कार्यरत आहे. एका व्यक्तीला व त्याच्या पत्नीवर उपचार करण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली होती.हे उपचार शासन नियमानुसार सवलतीत असूनदेखील पैशाची मागणी केल्याने बिळूर संबंधित तक्रारदार याने सांगली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावेळी प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला होता. जत पोलिसात कांबळे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिस उपआयुक्त राजेश बनसोडे, सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, अविनाश सागर, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, संजय संकपाळ, कलगुटगी, अजित पाटील, सलिम मकानदार, रवींद्र धुमाळ, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.