जेव्हा अन्यायाचा वाढला शीरजोर, तेव्हा गडी चढला की खांबावर!

शोले स्टाईलने स्टंट करीत संतप्त शेतकऱ्याने जत दुय्यम निबंधक कार्यालयासमोर टेलीफोन खांबावर चढून मागितला न्याय !
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
गावच्या पंचाकडे न्यायासाठी दाद मागूनही पंचाकडून न्याय न मिळाल्याने वाळेखिंडी येथील तरुण शेतकऱ्याच्या जत दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात दूरध्वनीच्या खांबावर चढून न्याय मागण्याच्या स्टंटची जत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
वाळेखिंडी ता.जत येथील शेतकरी श्री. बापूसाहेब नारायण शिंदे यांनी त्यांच्या शेतात विंधन विहीर खोदली होती. या विंधन विहीरीला चांगले पाणी लागल्याने बापूसाहेब शिंदे यांच्या भावकीने या विंधन विहीरीवर असलेल्या विद्युत मोटारीसाठी चोरून वीज कनेक्शन ( आकडा टाकून) घेतले होते.
परंतु विजमंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी सबंधितांवर गुन्हा दाखल करून चोरून वापरत असलेला विद्युत पुरवठा बंद केला. त्यानंतर बापूसाहेब शिंदे यानी आपल्या भावकीतील लोकांना कायदेशीर विद्युत कनेक्शन घ्या व विज वापरा असे सांगितले. परंतु भावकितील लोकांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. उलट बापूसाहेब यांनाच मारहान केली.
याविषयी बापूसाहेब यांनी गावच्या पंचाकडे न्यायासाठी दाद मागितली. परंतु पंचानीही बापूसाहेब यांचे ऐकले नाही व त्यांना न्याय दिला नाही. यानंतर त्यांनी जत पोलीसात दाद मागितली. परंतु पोलीसांनीही त्याला कसलीही मदत केली नाही.
शुक्रवारी बापूसाहेब हे आपल्या जमिनीसंदर्भात वाटप प्रकरणकामी जत दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात आले होते. परंतु बापूसाहेब व त्यांच्या भावकीत असलेल्या जमिनीचे वाटप प्रकरण हे जत तहसिलदार यांच्याकडे असल्याने त्यांच्या भावकितील लोक हे या परिसरात दिसत नसल्याने बापूसाहेब यांच्या रागाचा पारा चढला व ते झटपट जत दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात असलेल्या दूरध्वनीच्या खांबावर चढले व जोरजोरात मला न्याय पाहिजे म्हणून ओरडू लागले.
बापूसाहेब शिंदे हे दूरध्वनीच्या खांबावर चढून वर टोकापर्यंत पोहचल्याने या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी वाढली. यावेळी जत नगरपरिषदेचे भा.ज.प.चे नगरसेवक प्रकाश माने व अन्य लोकांनी त्याला समजावून खाली उतरायला भाग पाडले.
त्यानंतर बापूसाहेब शिंदे यांनी आपल्यावर आपल्या गावातील पंचांनी, पोलीसानी व महसूल प्रशासनाने कसा अन्याय केला हे सांगितलं व मला न्याय पाहिजे अशी मागणी केली.
याचीच जोरदार चर्चा जत तालुक्यात सुरू होती.