विलासराव जगतापांनी आगामी निवडणुकांचे फुंकले रणशिंग

भाजप जत तालुका अध्यक्षपदी प्रमोद सावंत यांची निवड
तर महिला आघाडी कार्याध्यक्षपदी तेजस्विनी व्हनमाने

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांसह भाजप नेते, कार्यकर्ते यांनी सज्ज रहावे. या निवडणुकीत भाजपचा झेंडा पुन्हा तालुक्यात फडकावयाचा आहे. तालुक्यातील भाजप कार्यकत्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज रहावे, असे आवाहन करत भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार विलासराव जगताप यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
यावेळी जत तालुका भाजपच्या अध्यक्षपदी अचकनहळीचे माजी सरपंच प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तर जत तालुका महिला आघाडी कार्याध्यक्षपदी तेजस्विनी व्हनमाने यांची निवड करण्यात आली. तालुक्यांतील भाजप कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मिलिंद कोरे, आर.के. पाटील, अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाऊ जाधव, माजी सभापती तम्माणगौडा रवी पाटील,डॉ. रवींद्र आरळी, आकाराम मासाळ, शंकर वगरे, कुंडलिक दुधाळ, उपसभापती विष्णू चव्हाण, उमेश सावंत, प्रकाश माने, लक्ष्मण बोराडे, बसवराज पाटील, बसवराज चव्हाण, गौतम ऐवळे, संग्राम जगताप आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी जि. प., पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात भाजप कार्यकर्त्याची मते विलासराव जगताप यांनी जाणून घेतली. यावेळी बोलताना भाजप नेते व कार्यकर्त्यानी आगामी निवडणुकीत भाजपची सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार विलासराव जगताप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आगामी जि. प., पंचायत समिती निवडणुकीकरीता भाजप कार्यकर्त्यानी सज्ज रहावे. निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच आपण स्वतः १० जि. प. गट, २० पंचायत समिती गणाचा दौरा करणार आहोत. या दौऱ्यात निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची मुलाखत व माहिती घेण्यात येणार आहे. ती माहिती जिल्हा नेत्यांकडे पाठवण्यात येईल व त्यानंतर उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.