जाडरबोबलाद येथील घटना, खुनाचे कारण अस्पष्ट
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथील एका खाजगी वाहन चालकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे. श्रीशैल निलाप्पा सायगाव (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खुनाचे कारण स्पष्ट झाले नसून पोलिसांचा तपास सुरु आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, जत तालुक्यातील जाडरबोबलाद – मारोळी रस्त्यालगतच्या ओढा पात्रात एका व्यक्तीचा खून करून मृतदेह टाकण्यात आला असल्याचे उघडकीस आले. तपासानंतर श्रीशैल सायगाव यांचा खून झाल्याचे समोर आले. अतिशय निर्घृणपणे तोंड, डोके ठेचून खून करून टाकला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. ही घटना रविवारी रात्री घडली असावी, असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. मृतदेहाजवळ रक्तांनी माखलेली कपड्याची पिशवी मिळून आली आहे. हा खून अन्यत्र करून तो इथे आणून टाकला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी भेट दिली आहे, पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या