राजेवाडीमध्ये पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

मुलीच्या मृत्यूचा मानसिक धक्का सहन न झाल्याने विरहातून केले कृत्य
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील हेगडे दाम्पत्याने मुलीच्या मृत्यूचा मानसिक धक्का सहन न झाल्यामुळे त्या विरहातून पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.करण हेगडे (वय २८ वर्षे) व शीतल हेगडे (वय २२ वर्षे) असे पती-पत्नीचे नाव आहे.
हेगडे यांच्या दोन वर्षाच्या मुलीचा गेल्या चार दिवसापूर्वी गळ्यामध्ये खाऊ पदार्थ अडकल्याने मृत्यू झाला होता. मुलीच्या मृत्यूवेळी झालेली तिची तडफड पाहून पती-पत्नी अत्यंत दु:खी होते. ते दुःख सहन न झाल्याने नैराश्यातून गुरुवार दि.३० जून रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राजेवाडीपासून काही अंतरावर असणाऱ्या कानिफनाथ मंदिराच्यासमोर करण हेगडे व त्याची पत्नी शीतल हेगडे या दोघांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
घटनेची माहिती राजेवाडीचे पोलीस पाटील यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. मयताच्याजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीमध्ये मुलीच्या विरहामुळे व्यतीत होऊन आम्ही आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. आमच्या मृत्यूस आम्ही स्वतः जबाबदार असल्याचे त्यात म्हटले आहे. पोलीस या घटनेसंदर्भात अधिक तपास करीत आहेत.