जतकरांच्या मदतीला धावले उमेश सावंत

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

शहरातील विजापूर-गुहागर महामार्गावरील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाच्या मोकळ्या जागेत मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच
जत शहरात सोलनकर चौक ते बसवेश्वर चौक येथे रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसवण्यासाठी जागा आहे. रस्त्याचे काम होऊन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. परंतु या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसविले नाहीत. तसेच दुभाजकाच्या जागी कॉन्ट्रॅक्टरकडून फक्त माती टाकली आहे.
गेली तीन-चार दिवस सलग पावसाचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे टाकलेली माती ओली होऊन रस्त्याचा भाग खचला आहे.परिणामी अपघाताची संख्याही वाढत आहे.याबाबतीत नगरपरिषदेकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही. शहरातील मुख्य रस्ता असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यावरून अवजड वाहनेसुद्धा वेगाने जातात. त्यामुळे शहरातील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून ये जा करावी लागत आहे. तसेच या रस्त्यावर छोट्या-मोठ्या प्रमाणात अपघात वारंवार घडत आहेत. ही बाब जत नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांच्या लक्षात येताच,त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने मुरूम टाकून दुभाजन मुजवण्याचा प्रयत्न केला. यामुळे जत शहरातून या कामाबद्दल कौतुक केले जात आहे.