दिवंगत माजी आम.उमाजीराव सनमडीकर यांना महाराष्ट्र विधानसभेकडून स्मृतीपत्र देऊन आदरांजली !

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

जत तालुक्याचे भाग्यविधाते,काँग्रेस पार्टीचे दिवंगत,कालकथित माजी आमदार उमाजीराव सनमडीकर(काका) हे कायम दुष्काळ असणाऱ्या जत तालुक्यातील सनमडी या गावी शेतकरी कुटुंबात जन्मले. चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण घेऊन ते देशसेवा करण्यासाठी लष्करात भरती झाले.१७ वर्षे देशसेवा करून ते आपल्या गावी आले. ते एवढ्यावरच न थांबता त्यांनी समाजकार्य करण्यास सुरुवात केली.त्यांची ही समाजप्रेमी तळमळ पाहून लोकांनी त्यांना राजकारणात येण्यास सांगितले.त्यांनी ग्रामपंचायत सदस्य ते पंचायत समिती सदस्य अशी वाटचाल केली.
त्यांची कार्य करण्याची तळमळ,प्रेमळ स्वभाव,सर्वांशी मिळून मिसळून राहण्याची पद्धत,साधी राहणीमान,गोरगरीबांसाठी झटणारे,समाजकार्य याची दखल घेऊन त्यांना सन 1985 साली जत विधानसभा मतदार संघातून तिकीट देण्यात आले. तेव्हा ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.अश्याचप्रकारे ते 1990 व 1999 असे तीनवेळा जत तालुक्याचे आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेमध्ये काम केले.
त्यांनी जत तालुक्याच्या ठिकाणी सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ आणि दत्त शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.गोरगरिबांच्या मुलांसाठी आश्रमशाळा सुरु केल्या. त्यांनी रेणुकादेवी मागासवर्गीय सह. शेतकरी सूतगिरणी, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, गजानन दूध उत्पादक सहकारी संस्थेचे संस्थापक संचालक म्हणूनही उत्तमप्रकारे कार्य केले होते.
या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा यांच्या कडून त्यांच्या स्मृतीला विनम्र आदरांजली वाहण्यात आली.हा कार्यक्रम जत तहसील कार्यालय जत येथे आयोजित केला होता. यावेळी आमदार श्री.विक्रमदादा सावंत,उपविभागीय अधिकारी श्री.जोगेंद्र कटरे,तहसीलदार श्री.जीवन बनसोडे यांच्या हस्ते पत्नी श्रीमती.कमल सनमडीकर आणि चिरंजीव डॉ.कैलास सनमडीकर यांना विधानसभा स्मृतीपत्र देण्यात आले.यावेळी तहसील कार्यालयातील कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.