ईनोव्हा कार-रिक्षा अपघातात ६ ठार!

समोरासमोर धडक;रिक्षाचा चक्काचूर, इनोव्हाची पलटी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
बीड

केज-अंबाजोगाई महामार्गावर होळजवळ ईनोव्हा कार आणि आप्पे रिक्षाची समोरासमोर धडक होवून सहाजण ठार झाले. रिक्षाचा चक्काचूर झाला तर इनोवा कार गाडी रिक्षाला धडकून रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. यात जागेवरच चार जणांचा मृत्यू झाला.या अपघातात अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आतापर्यंत एकूण सहाजण ठार झाले आहेत.
केज तालुक्यातील अंबाजोगाई-केज या राष्ट्रीय महामार्गावर होळ जवळ दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि ईनोव्हा कारची धडक झाली. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचे तुकडे-तुकडे झाले. ईनोव्हा कार रिक्षाला धडकून रस्त्याच्या बाजूला पलटी झाली.
या अपघातात मच्छिंद्रसिंग चरणसिंग बोके (३६, रा. केज), बालाजी संपत्ती मुंडे (२८, रा. पिसेगाव) आणि दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर काही खाजगी वाहने आणि अ‍ॅम्बुलन्स बोलावून अपघातग्रस्तांना अंबाजोगाई येथील स्वरात रुग्णालयात हलवले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.अपघात इतका भीषण होता की, आसपास असलेल्या लोकांना काय झाले हेच समजत नव्हते.