प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
औरंगाबाद
देवगिरी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची शनिवारी भरदिवसा गळा चिरून व पोटात खंजीर खुपसून हत्या करण्याची घटना घडली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली होती. खून करून फरार झालेल्या आरोपी तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिकमधील लासल गाव येथून रविवारी ताब्यात घेतले आहे.देवगिरी कॉलेज जवळील रचनाकार कॉलनीत शनिवारी खुनाची घटना घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार मयत सुखप्रीत कौर ऊर्फ कशीश प्रीतपालसिंग ग्रंथी ही विद्यार्थिनी देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तिच्यावर आरोपी शरणसिंग सेठी (२०, रा.भीमपुरा, उस्मानपुरा) याचे एकतर्फी प्रेम होते.दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते.शरणसिंग अनेक दिवस सुखप्रीतचा एकतर्फी प्रेमातून पाठलाग करीत होता.तिच्या कुटुंबीयांनीही त्याला समजावून सांगितले, तरीही तो ऐकत नव्हता.
शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कशीश मैत्रिणीसोबत महाविद्यालयात गेली.आरोपी शरणसिंगनेही तिचा माग काढत तिला गाठले आणि तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला व भेटण्याचा आग्रह धरला.परंतु तिने नकार दिला. दुपाच्या सुमारास सुखप्रीत आपल्या मैत्रिणींसोबत रचनाकार कॉलनीजवळील एका कॉफीच्या दुकानात गेली. तेथेही आरोपी शरणसिंग तिचा पाठलाग करीत आला. सुखप्रीत हॉटेलच्या बाहेर येताच त्याने तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिला २०० फूट अंतरावर असलेल्या रिकाम्या प्लॉटच्या दिशेने बळजबरीने नेले आणि तिच्यागळ्यावर, मानेवर, पोटावर धारदार हत्याराने १८ वार केले. त्यानंतर शरणसिंग तेथून दुचाकीवरून पळून गेला.
ही घटना घडतातच सुखप्रीतच्या मैत्रिणीने कशीशच्या भावाला फाेन करून ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. दोन्ही भाऊ घटनास्थळी आले. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली होती. अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला नाशिकमधील लासल गाव येथून रविवारी ताब्यात घेतले. वेदांतनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या