निमगाव येथे मंगळवारपासून ‘युवा विचार मंथन’चे आयोजन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

अटल प्रतिष्ठान,माळशिरस व के.के.पाटील मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांच्या सकारात्मक भविष्याच्या वाटचालीस योग्य दिशा देण्यासाठी निमगाव (ता.माळशिरस) येथे मंगळवार दि.१७ ते २० मे दरम्यान युवा विचार मंथन व महिलांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष के.के.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले की,सदर कार्यक्रम सलग चार दिवस चालणार असुन मंगळवार १७ मे रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या हस्ते होणार आहे. याच दिवशी पाटोदा येथील आदर्श सरपंच डाॅ. भास्करराव पेरे पाटील यांचे गावाच्या विकासासाठी सुसंवाद या विषयावर व्याख्यान होणार आहे.
बुधवार १८ रोजी युवा व्याख्याते डाॅ.शैलेश मदने यांचे अत्याधुनिक गायगोठा या विषयावर व्याख्यान होणार असुन अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे प्रमुख पाहुणे म्हणुन लाभणार आहेत.
गुरूवार १९ मे रोजी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन युवा उद्योजक अभिजीत पाटील यांचे तरूणांना व्यवसायिक मार्गदर्शन यावर व्याख्यान तसेच युवा व्याख्याते गणेश शिंदे यांचे तरूणांनो उद्योजक व्हा या विषयावर व्याख्यान होणार असुन सदर कार्यक्रमास माळशिरसचे तहसीलदार जगदिश निंबाळकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
शुक्रवार २० मे रोजी भव्य महिला मेळावा संपन्न होणार असुन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांचे सामाजिक जीवनातील महिलांचा सहभाग या विषयावर व्याख्यान होणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणुन माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे असतील अशी माहिती के.के.पाटील यांनी दिली.
यावेळी वसंत पाटील,श्रीमंत मगर,अशोक मगर,किरण पाटील,अमर मगर,नितीन मगर,सुधीर मगर,सचिन मगर,मिनिनाथ मगर यांच्यासह के.के.पाटील मित्रपरिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.