कोल्हापूरच्या हेरवाड ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय

विधवांचे कुप्रथांनी हिरावलेले मानवी अधिकार पुन्हा बहाल!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
शिरोळ/कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्याला साजेसा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गावातील विधवा महिलांचे समाजातील कुप्रथांनी हिरावून घेतलेले मानवी अधिकार पुन्हा बहाल केले आहेत.गावामध्ये व देशामध्ये विधवा महिलांनाही सन्मानाने जगता आले पाहिजे, याकरिता विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे व त्या संदर्भात गावामध्ये जनजागृती करण्यात यावी असा ऐतिहासिक व क्रांतिकारी ठराव ग्रामसभेने मंजूर केला आहे.
हेरवाड ग्रामपंचायतीने दि.४ मे, २०२२ रोजी घेतलेल्या ग्रामसभेत विषय क्रमांक ४ मध्ये विधवा प्रथा बंद करणे संदर्भात चर्चा करणे या विषयावर आधारित क्र.४ ठरावात म्हटले आहे कि, “आपल्या समाजात पतीच्या निधनावेळी, अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे असे प्रकार करण्याची प्रथा आहे. तसेच महिलाला ‘विधवा’ म्हणून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही.कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे. म्हणजेच या प्रथेमुळे कायद्याचा भंग होत आहे. तरी आपल्या गावामध्ये व देशामध्ये विधवा महिलांनाही सन्मानाने जगता आले पाहिजे, याकरिता विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. या संदर्भात गावामध्ये जनजागृती करण्यात यावी. त्यास ही सभा मंजुरी देत आहे.” या ठरावावर सूचक म्हणून सौ.मुक्ताबाई संजय पुजारी तर अनुमोदक म्हणून सौ.सुजाता केशव गुरव यांची नावे आहेत. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची नक्कल दिनांक ५ मे २०२२ रोजी उपलब्ध झाली आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीच्या या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णयाचे सर्वत्र स्वागत होणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षातही कायद्याने स्त्रियांना जगण्याचा समान हक्क दिलेला असताना आजही समाजात महिलांना दुय्यम स्थान दिले जाते, ही वस्तुस्थिती आहे.
समाजातील विधवा महिलांची स्थिती तर मोठी दयनीय आहे. तिच्याकडे बघताना भेदाच्या भावनेने बघितले जाते. सुवासिनी महिलांच्या तुलनेने त्यांचा कायम अवमान केला जातो. वर्तमान समाज सुधारणेचा कितीही आव आणत असला तरी महिलांच्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात विधवा महिलांना सन्मान दिला जात नाही . पांढऱ्या कपाळाची म्हणून तिला हिणविले जाते. या सर्व प्रथांना कुठे तरी मूठमाती देण्याचे अलौकिक कार्य या ग्रामपंचायतीने केले आहे.
राज्याचे माहिती उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.या माहितीमध्ये त्यांनी हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावाची ऐतिहासिक प्रत जोडली आहे.