साहित्यिक रघुराज मेटकरी यांना साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल विलास खरात यांनी केले अभिनंदन!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
विटा

विटा येथील साहित्यिक रघुराज मेटकरी यांना साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यरत्न डॉ.शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलास खरात यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
रघुराज मेटकरी यांनी प्रतिकूल परिस्थितीत साहित्यक्षेत्राची आवड जोपासली.दूरदृष्टीतून साहित्य निर्मिती केली.साहित्य सेवा मंडळाच्या माध्यमातून विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन केले. मुक्तांगण वाचनालय उभे करून वाचन चळवळ वाढविली.विटेकरांना, समाजाला साहित्यरूची निर्माण व्हावी, यासाठी सतत धडपड सुरू ठेवली. अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेवून गेल्या ४५ वर्षात ४१ साहित्य संम्मेलनांचे नेटके संयोजन केले. दिग्गज व नामवंत साहित्यिक, कवी, वक्त्यांची मंदियाळी विटे नगरीत अवतरली, ती त्यांच्या अथक परिश्रमामुळेच!
काव्य व्यक्तीचरित्र, कथासंग्रह, कादंबरी अशा अनेक साहित्य प्रकरणातील त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत, हे त्यांच्या साहित्य अभिरुचीचे व विपूल लेखनाचे प्रतिक आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब साहित्य सेवेत रमते, हा साहित्यावरच्या निस्सिम प्रेमाचा भाग मानावा लागेल. तमाम विटेकर व विविध गावातील असंख्यांना कवी, साहित्यिक, साहित्य रसिक बनविण्यासाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. शिक्षण क्षेत्रातही कार्य उंच आहे.
विविध क्षेत्रात खास करून साहित्य क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. साहित्य जगणाऱ्या आणि साहित्य उन्नतीसाठी तन-मन-धन अर्पण करणाऱ्या विटे नगरीला संम्मेलनाचं गाव अशीही ओळख निर्माण करून देणाऱ्या अशा साहित्य साधकास पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याबद्दल साहित्यरत्न डॉ.शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलास खरात यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.