खोटा धनादेश देणाऱ्याला सहा महिने तुरुंगवास व दंडाची शिक्षा

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी :
खोटा धनादेश दिल्याप्रकरणी आटपाडी येथील फौजदारी न्यायालयातील न्यायाधीश मा.विनायक दत्तात्रय पाटील यांनी एका खटल्यात आरोपीस सहा महिन्यांचा तुरुंगवास व दोन लाख,४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आटपाडी येथील सतिश चिंतू लांडगे यांनी ॲड. चेतन व्ही.जाधव यांचेमार्फत योगेश अंकुश पवार (रा.आंबेगाव पठार, पुणेे) याच्याविरुद्ध निगोशिएबल इंस्ट्रूमेंट ॲक्ट कलम १३८ अन्वये आटपाडी न्यायालयात खटला दाखल केला होता. आरोपी योगेश पवार याने फिर्यादी सतिश लांडगे यांचेकडून मे २०१५ मध्ये एक लाख, ४८ हजार रुपये रक्कम उसनवार घेतली होती. ही रक्कम परतफेडीसाठी त्याने लांडगे यांना एक लाख ४८ हजार रुपयांचा धनादेश दिलेला होता. हा धनादेश वटला नाही, म्हणून लांडगे यांनी ॲड.चेतन व्ही.जाधव यांच्यामार्फत आटपाडी येथील फौजदारी न्यायालयात खटला दाखल केला होता.
न्यायालयाने फिर्यादी व आरोपी यांचे सर्व पुरावे पाहून योगेश अंकुश पवार याला सहा महिने तुरुंगवासाची व दोन लाख, ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.फिर्यादीतर्फे ॲड.चेतन व्ही.जाधव यांनी काम पाहिले.